मंत्री गोविंद गावडे : विविध क्षेत्रांतील कलाकारांचा कला गौरव सोहळ्यात सन्मान
पणजी : कलाकार अनेकदा टीकेचे धनी होतात. अनेक संकटे झेलून कलाकारांनी गोव्याच्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धनाचे काम केले. पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी कलेचे कधीच संवर्धन केले नाही. अनेकांनी आपल्या कुटुंबांकडे दुर्लक्ष करून कलेच्या प्रेमापोटी पदरमोड केली. त्यामुळेच कला क्षेत्रात गोव्याचे नाव केवळ देशभरात नव्हे, तर जगभरात पोहोचले आहे, असे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले. कला आणि संस्कृती खात्यामार्फत पणजीतील कला अकादमीत दिनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये मंगळवारी आयोजित कला गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासा?बत खात्याचे सदस्य सचिव अरविंद खुटकर, संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीत, लोकनृत्य, भजन, किर्तन, कला, नाटक, तियात्र, साहित्य अशा विविध क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. त्यात विनायक मनमोहन नागवेकर, केशव नाडकर्णी, सदानंद गोवेकर, सावळो नाईक, दत्तात्रय बर्वे, अविनाश पुरखे, सागर पानवेलकर, संदीप नाईक- गांवकर, किशोर नार्वेकर, शंभुभाऊ बांदोडकर, सुनिल पालकर, मेघना कुऊंदवाडकर, झेफेरीनो डायस, अना मारीया डिक्रूझ, ज्योकीम फर्नांडिस, रोझारीयो बोथेल्लो, ज्यो डिसोझा, बेनू कवळेकर, गजानन नाईक, जयराम देसाई, चिंतामणी तळवणेकर, विष्णू म्हामल, जीवन नाईक, आग्नेलो फर्नांडिस, चंद्रकांत जल्मी, ग्राब्रियल डायस, सुभद्रा गवस, वसंत गावडे, प्रमिला बेतकीकर, श्रीकांत केरकर अशा एकूण 30 जणांचा समावेश होता.
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या स्वरमंगेश कार्यक्रमात बोलताना संजय उपाध्ये यांनी कलेच्या बाबतीत केवळ भारताची नव्हे तर जगाची राजधानी बनण्याची क्षमता गोव्यात असल्याचे वक्तव्य केले होते. याचे संपूर्ण श्रेय राज्यातील सर्व कलाकारांना जाते, असे मंत्री गावडे म्हणाले. नाटक, कार्यक्रम बसवत असताना दिग्दर्शक, कलाकारांना प्रचंड आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच कला आणि संस्कृती खात्याने त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्याचा फायदा राज्यातील हजारो कलाकारांना मिळत आहे. यापुढेही कलाकारांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये यासाठी आपण नेहमीच कार्यरत असेन, अशी हमीही त्यांनी दिली.
विश्वास होता म्हणूनच कलाकारांकडून विरोध नाही
कला अकादमीवरून गेल्या दोन वर्षांत आपल्यावर अनेक आरोप झाले. परंतु, आरोप करणाऱ्यांत एकही कलाकार सहभागी झाला नाही. कारण कला अकादमीच्या इमारतीला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार योग्यप्रकारे काम करीत असल्याचा विश्वास त्यांना होता. त्यामुळेच त्यांनी कधीही विरोध केला नाही, असेही मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
तरुण भारतच्या बातमीवर दिले स्पष्टीकरण
कला अकादमीच्या ग्रीन ऊममधील आरसा कोसळल्याची बातमी बुधवारी तरुण भारतने प्रसिद्ध केली होती. त्या घटनेवरही मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी भाष्य केले. नूतनीकरण झालेल्या कला अकादमीच्या इमारतीचे उद्घाटन झाले असले, तरी अंतर्गत छोटी कामे पूर्ण करण्यासाठी काही दिवस जातील असे आपण याआधीच सांगितले आहे. ग्रीन ऊममधील जो आरसा पडला, तो एका कार्यक्रमाच्या अगोदरच्या दिवशी लावण्यात आलेला होता. तो चुकून पडला, असेही त्यांनी सांगितले.