प्रतिनिधी/ बेळगाव
आपल्यामध्ये एक अहंभाव असतो, ज्यामध्ये असुरक्षितता आणि दु:खभावना आहेत. तर दुसरा अहं जो आहे, त्यामध्ये या भावना नाहीत. दुसरा अहं परिवर्तित होत नाही. त्याच्याशी जुळवून घेणे म्हणजेच वेदांत होय, असे विचार स्वामी अभेदानंद यांनी मांडले.
चिन्मय मिशन बेळगावतर्फे सुरू असलेल्या ‘पूर्णत: की अनुभुती कैसे हो’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, वेद हा अलौकिक शब्दप्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, अर्थापत्ती, अनुपल, उपमान, शब्दप्रमाण असे त्याचे भाग आहेत.
सायंकाळच्या सत्रामध्ये ते म्हणाले, आपल्या जीवनात श्रद्धा महत्त्वाची आहे. कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी श्रद्धा असायला हवी. प्रार्थना भाव आपल्यामध्ये असायला हवा. आपल्या जीवनामध्ये गुरुचा सहवास आपल्याला मिळायला हवा आणि विवेकही आपण बाळगायला हवा. आपण ईश्वराप्रती कायम कृतज्ञ राहायला हवे.
याच मालिकेंतर्गत 27 रोजी सकाळी झालेल्या व्याख्यानात ‘वेदांत नाम उपनिषद प्रमाण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. आत्मा आणि अहं यातील फरक उपनिषद स्पष्ट करतो. उप+नि+षद म्हणजेच आत्म्याच्या ब्रह्मत्वाचे ज्ञान आहे. एकूण 108 उपनिषद असून तैतर्य उपनिषद, शुक्ल यजुर्वेद आहे. वेदांताचे ज्ञान मिळविण्यासाठी श्रद्धा, शुद्ध बुद्धी, शुद्ध मन, शरीरस्वास्थ्य, अनुकूल परिस्थिती आणि गुरुचा अनुग्रह आवश्यक आहे.









