14 रोजी मेळाव्याचे आयोजन, विविध सत्रात कार्यक्रम
वार्ताहर/नंदगड
खैरवाड (ता. खानापूर) येथे सन 1937 मध्ये स्थापन झालेल्या मराठी प्राथमिक शाळेला 88 वर्षे पूर्ण झाली. मातृभाषेचे ज्ञान देऊ केलेल्या शाळेच्या आठवणी आजही आम्हाला प्रेरणा देतात. मराठी शाळेची प्रगती व्हावी. मराठी शाळा टिकावी. प्रत्येकाने मराठी शाळेकडे यावे, या उद्दात हेतुने 1997-89 सालच्या इयत्ता 7 वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसोहळा आयोजित करून मराठी शाळेतील आठवणी जागृत करणे, भविष्यात मराठी शाळेची भरभराट व्हावी, विद्यार्थ्यांची संख्या वाढावी. हा यामागचा उद्देश आहे. त्याकरिता शाळेच्या 1997-98 सालाच्या इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. 14 जून रोजी आयोजित केला असल्याची माहिती खानापुरात आयोजित पत्रकार परिषदेत माजी विद्यार्थी मंजुनाथ बस्तवाडकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी विद्यार्थी परशराम कोलेकर, मारुती कोलेकर, रोहित बागे (शिक्षक), मंजुनाथ बस्तवाडकर तसेच माजी विद्यार्थीनी मंदिरा भुजगुरव, अनिता झुंजवाडकर, गौरी मडवाळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा, आजी माजी शिक्षकांचा सत्कार, वक्त्यांचे भाषण व दुसऱ्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा वर्ग, जुन्या आठवणीना उजाळा व इतर कार्यक्रम होणार आहेत.









