प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी ठळकवाडी हायस्कूल, टिळकवाडी-बेळगाव शाळेचा 2000-01 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. ही बॅच म्हणजे व्ही. एम. शानभाग (एसकेई सोसायटीची प्राथमिक शाळा) या मराठी शाळेची पहिली बालवाडीची बॅच. त्यामुळे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्या हे की मुलांनी ठळकवाडी हायस्कूल आणि माजी शिक्षकांबरोबरच आपल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकवर्गालाही निमंत्रित केले होते.
‘मैत्री शाळेतील बाकावरची, आठवणीतील नात्याची..!’ अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन ठरविण्यात आली होती. सर्वप्रथम सकाळी 8.30 वाजता बॅचतर्फे शाळेतील मुला-मुलींसाठी चक्रपाणी युद्धकला केंद्र, बेळगाव यांच्यातर्फे सर्वांग सुंदर व्यायाम, स्वसंरक्षणाचे धडे, लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक सचिनभाऊ चोपडे यांनी दिले.
त्यानंतर सर्व शिक्षकांवर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत शाळेतील आजगावकर सभागृहापर्यंत नेऊन त्यांना स्थानापन्न केले. मुख्याध्यापक राजाराम कुडतूरकर, विद्या दाभोलकर यांनी उपस्थित मान्यवरांसह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सर्व आजी-माजी शिक्षक, कर्मचारीवर्ग यांचा शाल, श्रीफळ, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या बॅचमधील देशसेवेत रुजू असलेले आणि निवृत्त झालेल्या सैनिकांना गौरविण्यात आले.
शिक्षक सहदेव बाळेकुंद्री, सुरेश भातकांडे, सी. वाय. पाटील आणि कमल (नम्रता) कुलकर्णी टीचर यांनी आपले अनुभव, शाळेतील जुन्या आठवणी सांगत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही आपले शाळेतील अनुभव, जुन्या आठवणी सांगत गप्पांचा आनंद लुटला. सामाजिक बांधिलकी म्हणून मराठी शाळा टिकविण्यासाठी जमेल ते कार्य करण्याचा निश्चय एकमताने सर्व माजी विद्यार्थ्यांनी केला. यानंतर जे शिक्षक व विद्यार्थी हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
धीरज व सूरज या दोघा भावांनी भोजनाची व्यवस्था केली होती. भोजनानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांचा समूह फोटो व स्मृतिचिन्ह भेट देऊन सन्मान करण्यात आला. नंतर ज्या कै. दिनकर आपटे सरांनी एसकेई सोसायटीच्या प्रोत्साहनाने व मार्गदर्शनाखाली हा प्राथमिक विभाग सुरू केला, त्यांच्या प्रतिमेची पूजा करून ती प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली.









