अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, जो सर्वाभूती माझेच रूप पाहून त्याच्यासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय आवश्यक ते करण्यात धन्यता मानतो आणि त्याप्रमाणे वागतो तो माझी सर्वोत्तम भक्ती करत असतो. अर्थातच त्याच्या बुद्धीची जागा माझी बुद्धी घेते. माझ्या बुद्धीला महाबुद्धी म्हणतात. तिच्यामुळे प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण करायची इच्छा होते. ह्याप्रमाणे महाबुद्धी प्राप्त झालेला भक्त सर्वाभूती माझे दर्शन घेत, केलेलं प्रत्येक कर्म मला अर्पण करून स्वत:च परिपूर्ण ब्रह्म होतो. गंमत पहा, मायेने निर्माण केलेल्या मिथ्या देहाकडून केले जाणारे कर्म मला अर्पण करणारे स्वत: निरंतर सत्य असलेले ब्रह्म होतात. हे म्हणजे आवळा देऊन कोहळा मिळवल्यासारखे आहे. खरे म्हणजे मिथ्या देहाकडून केले जाणारे कर्माचरण माणसाला दृढ बंधनात अडकवते पण तेच कर्म जर मला अर्पण केले तर तसे करणारा स्वत:च ब्रह्म होतो. अनित्य असलेल्या देहाच्या माध्यमातून नित्यावस्तूची गाठ पडावी अशी बुद्धी होणे ह्यालाच ज्ञानामुळे झालेली संतुष्टी असे म्हणतात. अशाप्रकारे निष्ठेने केलेला परमार्थ साधकाला संतुष्ट कसा करतो हे श्रीकृष्णनाथानी सांगितले. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, उद्धवा, ह्याबद्दल निरनिराळी मते आहेत पण खरे आणि अतिशुद्ध ब्रह्मज्ञान कोणते ह्याबद्दल माझे मत काय आहे किंवा मला काय वाटते ते मी तुला हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने सुगम करून सांगितले.
अशा गोष्टी मी माझ्या अनन्य भक्तांनाच सांगत असतो. हे ज्ञान ब्रह्मादि देवांनासुद्धा दुर्गम असते. वेदशास्त्रांनासुद्धा ह्याची पूर्ण कल्पना येत नाही त्यामुळे ते केवळ तर्क करतात. ज्याप्रमाणे एखाद्या सरोवराच्या खोलीचा जेव्हा अंदाज येत नाही त्यावेळी त्याच्या कडेकडेने फिरून लोक त्याच्या खोलीचा अंदाज घेत असतात त्याप्रमाणे आजूबाजूला हातपाय मारून वेदशास्त्रs अंदाज लावत असतात आणि शेवटी थकून जाऊन नेती, नेती, नेती म्हणजे माहित नाही, माहित नाही, माहित नाही असे कबूल करून हात टेकल्याचे मान्य करतात. ते ज्ञान मी तुला जेव्हढे सोपे करून सांगता येईल तेव्हढे सोपे करून सांगितले. माझे बोलणे जो समजून घेईल त्याचे सर्व संशय जळून खाक होतील आणि तो कायमचा ब्रह्मसंपन्न आणि स्वानंदपूर्ण होईल. जो ह्या गुह्यज्ञानाचे श्रवण, पठण करेल तो धन्य होईल. उद्धवा ज्यांना आत्मज्ञान झालेले आहे ते हा भवसागर तरुन जातील ह्यात नवल नाही पण ज्यांना ह्याबद्दल कल्पना नसते अशा भोळ्याभाबड्या, अज्ञानी लोकांच्याबद्दल विशेष आस्था बाळगून, त्यांना ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल हा प्रश्न विचारलास ह्याचे मला मोठे कौतुक वाटले. उद्धवाची ही कृती तुकाराम महाराजांनी म्हंटल्याप्रमाणे जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले, तो चि साधु ओळखावा, देव तेथे चि जाणावा अशा पद्धतीची झाल्यामुळे भगवंतानी आनंदून जाऊन मोठ्या संतोषाने उद्धवाला गुह्यज्ञान सांगितले. त्यामुळे सामान्य जनांना ह्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ह्यावरून एक लक्षात येते की, भगवंत त्यांच्या लाडक्या भक्तासाठी, त्यांचे मन राखण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतात. आता हेच पहाना, जे ब्रह्मज्ञान ब्रह्मादिकानाही अनाकलनीय आहे ते ब्रह्मज्ञान उद्धवाच्या एका विनंतीसरशी भगवंतांनी समजावून सांगितले. पुढे भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे वासराने नुसता हुंकार द्यायचा अवकाश गायीला पान्हा फुटतो त्याप्रमाणे तुझा प्रश्न ऐकल्यावर मी स्वानंदाने संतुष्ट झालो. ज्याप्रमाणे ताह्या कासवाने कोणतीही मागणी न करता नुसतं त्याच्याकडे बघितल्यावर कासवी डोळ्यातून त्याला अमृतपान करवते त्याप्रमाणे तुझ्याकडे नुसते पाहिल्यावर माझ्या हृद्यीचे ब्रह्मज्ञान ओसंडून वाहू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून मी हे निरुपण केले.
क्रमश:








