भालके बी. के. ग्रामस्थांमधून संतापाची लाट : गुंजी ग्रा. पं.चा अजब कारभार
वार्ताहर /गुंजी
गुंजी ग्रामपंचायत व्याप्तीतील भालके बी. के. वॉर्ड नंबर 7 मध्ये अर्धवट असलेल्या कामाचे संपूर्ण बिल काढल्याने भालके नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून काम करण्याआधीच बिल काढलेल्या पंचायत अधिकाऱ्यांवर योग्य तो क्रम घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
भालके बी. के.मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी 2018 मध्ये रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्यात आली होती. या विहिरीचे पाणी गावामध्ये आणण्यासाठी गुंजी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून विद्युतखांब घालण्यासाठी एक लाख 35 हजार रुपयांची तरतूद केली होती. मात्र सदर काम केवळ या ठिकाणी चार खांब उभे करून बंद करण्यात आले होते. एक वर्षांपूर्वी ताराविना खांब उभारुन सदर कामाचे बिल 1 लाख 22 हजार रुपये खर्च दाखवून काढण्यात आल्याचे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांना समजल्याने ग्रामस्थांत एकच खळबळ उडाली. काम पूर्ण न होताच बिल कसे काढण्यात आले, असा जाब विचारल्यानंतर पिडिओंनी सदर काम चार दिवसात पूर्ण करून देतो, असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र पंधरा दिवस लोटले तरी अद्याप ते काम न झाल्याने भालके ग्रामस्थांनी सदर कामाबद्दल खानापूर ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आपली तक्रार नोंदविली असल्याचे ग्रा.पं. माजी अध्यक्ष सुभाष घाडी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तसेच याची दखल घेतली नाही तर ग्रामस्थ जि.पं. व जि.पं. मुख्य सचिवांपर्यंत तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
पंचायत व्याप्तीत खळबळ
अर्धवट कामाचे बिल काढल्याची माहिती गुंजी ग्रामपंचायत व्याप्तीतील नागरिकांना समजल्याने एकच खळबळ उडाली असून अशी अनेक कामे झाली असल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे. वास्तविक अनेक कामे पूर्ण होऊनही त्याचे बिल लवकर मिळत नसल्याची तक्रार अनेकवेळा पंचायतीतून ऐकावयास मिळते. मात्र काम होण्याआधीच बिल काढले गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतचे विकास अधिकारी आणि अध्यक्षा यांच्याकडे येथील नागरिक साशंक नजरेने पाहत असल्याचे बोलले जात आहे.









