ऊसतोड कामगारांची व्यथा : शाळेविना विद्यार्थ्यांचे नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊस तोडणीसाठी सध्या हजारो मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. परंतु मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तंबूशाळा उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मजुरांच्या गरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोटासाठी शेकडो कि. मी. अंतरावरून आलेल्या मजुरांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नसल्याने तेही हतबल झाले आहेत.
बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. हजारो शेतकरी ऊस लागवड करीत असल्यामुळे हा जिल्हा साखरेचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. ऊस तोडणीला आला की महाराष्ट्रातील बीड, उस्मानाबाद, लातूर तर कर्नाटकातील विजापूर, बिदर येथील मजूर दाखल होतात. तीन-चार महिने ते याच परिसरात ऊस तोडणीच्या कामावर असतात. बेळगाव जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असल्याने हजारो ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये दाखल होतात.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 26 साखर कारखाने आहेत. अथणी व गोकाक येथे प्रत्येकी 4, हुक्केरी, निपाणी, चिकोडी, सौंदत्ती, रायबाग, रामदुर्ग, बैलहोंगल येथे प्रत्येकी 2 तर कागवाडमध्ये 1 साखर कारखाना आहे. मागील दोन महिन्यांपासून ऊसतोड कामगार जिल्ह्यात येऊनही तंबूशाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अर्धा हंगाम संपत आला तरी शिक्षण विभागाने शाळा सुरू न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जवळील शाळांमध्ये विद्यार्थी वर्ग
जिल्ह्यात दाखल होणारे ऊसतोड कामगार हे अधिकतर मराठी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मराठी तंबूशाळा सुरू करणे गरजेचे आहे. परंतु गोकाक, रायबाग, रामदुर्ग, बैलहेंगल व सौंदत्ती या तालुक्यांमध्ये मराठी शाळा तितक्याशा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. शिक्षण विभागाकडून साखर कारखाना परिसरात अथवा ऊस तोडणी ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थी वर्ग केले जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
तंबूशाळा म्हणजे काय? ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या तीन-चार महिन्यांसाठी दाखल होतात. आपल्या सोबत या टोळ्या कुटुंबालाही घेऊन येतात. त्यामुळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने साखर कारखाना परिसर अथवा ज्या भागात टोळ्या सर्वाधिक आहेत तेथे तंबूशाळा उघडल्या जातात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावांमध्ये जावून पुन्हा शिक्षण घेऊ शकतात.









