सांगली :
आयर्विन या सांगलीतील ९३ वर्षे जुन्या पुलाला समांतर पर्यायी पुलाचे काम पुन्हा वेग घेत असून, येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या पुलावर दोन्ही बाजूंनी खडीकरण सुरू असून, त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलास पर्यायी पूल उभारण्याचा निर्णय २०१९ मध्ये युती सरकारच्या काळात झाला होता. त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष कामास उशीर झाला. महाविकास आघाडीच्या काळात काम सुरू झाले. दीड वर्षात बराच भाग पूर्ण झाला तरी काही काम बाकी होते.
दरम्यान निधीअभावी ठेकेदार कंपनी ‘मनोजा स्थापत्य’ने काहीकाळ काम बंद ठेवले होते. सुरुवातीला मंजूर २५ कोटींपेक्षा वाढीव खर्च झाल्याने सरकारने आणखी १० कोटींची तरतूद केली. त्यापैकी ९ कोटी रुपये मिळाले नव्हते. आता काम पुन्हा सुरू झाले असून, लवकरच डांबरीकरणही पूर्ण होणार आहे. पुलाच्या रचनेमुळे पावसात पाणी साचणार नाही, निचरा योग्य होईल, असे सांगण्यात आले आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांनी दिली.
- जुना आकर्षक मात्र कमकुवत होणारा पूल
आयर्विन पूल अर्थात कृष्णा नदीवरील जुना पूल १९२७-२९ या काळात बांधला. या पुलाचे नाव व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या नावावरून ठेवण्यात आले, ज्यांनी १९२६-३१ या काळात भारतात ब्रिटिश सत्तेचे नेतृत्व केले आणि पुलाचे उद्घाटनही त्यांनीच केले. आकर्षक आणि सौंदर्यपूर्ण बांधकामामुळे महाराष्ट्रभर जुना पूल प्रसिद्ध आहे. सुमारे ९३ वर्षे सांगलीच्या वाहतुकीसाठी सेवेत आहे. २००५ पासून अनेकदा आलेले महापूर, वाहतुकीचा वाढता लोड यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक बंद असून सांगली शहरात प्रवेश करण्यासाठी बायपास पुलावरून लांबचे अंतर पार करून एस टी व इतर वाहतूक सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेतही बसत असल्याने स्थानिकांकडून पर्यायी पुलाची मागणी होती. मात्र मुख्य बाजारपेठेतून कापडपेठ मार्गे वाहतूक नेण्यासही स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने पर्यायी पूल बांधूनही मार्ग कसा काढायचा यावर वाद होता. त्यात निधीची टंचाई निर्माण झाली होती. आता हा पूल पूर्वीच्या पुलाला समांतर आणून टिळक चौकाच्या मार्गाला जोडला जाणार आहे.
- पर्यायी पूल निर्णय, निधीचा रखडता प्रवास
या पुलाजवळ पर्यायी पूल बांधण्याचा निर्णय महापूरानंतर स्ट्रक्चरल तपासणी नंतर घेण्यात आला. २०१९ मध्ये यासाठी ठराविक ठिकाण, तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया सुरू झाली होती. एकूण अनुमानित खर्च अंदाजे २५ कोटी रुपये आहे, त्यात सुरुवातीला या कामासाठी निधी उपलब्ध झाला. कॉपिड बिल अडकल्याने आणि निधी मिळत नसल्याने काम काहीकाळ ठप्प झाले आणि ठेकेदाराने काम थांबवले होते. सरकारने १० कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद केली तर त्यातील ९ कोटी प्राप्त झाले नव्हते. अखेर मार्च २०२५ मध्ये, ठेकेदाराचे थकलेले बिल मंजूर झाले आणि काम पुन्हा सुरू झाले आता खडीकरणाचे काम जोरात सुरू असून, डांबरीकरण देखील लवकर सुरु होणार आहे.
पाऊस आला तरी पुलावर पाणी साचून राहणार नाही, पाण्याचा निचरा होईल आणि त्यामुळे डांबरीकरण, उखडणार नाही. सुमारे एक महिन्याभरात हा पूल वाहन वाहतुकीसाठी खुला करण्याचा मानस आहे.
– कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर.








