वाळवंटी नदीवर तात्पूरता अतिरिक्त पंप बसवणार : सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होणार
प्रतिनिधी / वाळपई
जलसिंचन खात्याने पाटबंधारे दुरुस्ती हाती घेतल्यामुळे केरी भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. सोमवारपर्यंत सदर पाटबंधाऱयाची दुरुस्ती पूर्ण होणार आहे. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून वाळवंटी नदीच्या पाण्यावर अतिरिक्त पंप बसून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारपासून पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्वपदावर येण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
केरी सत्तरी भागात गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिक अस्वस्थ बनलेले आहेत. बुधवारी आमदार डॉ. देविया राणे यांनी पर्यायी व्यवस्था करण्याचा आदेश दिल्यानंतर वाळवंटी नदीवर पंप बसून जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र सदर पाणी कमी पडू लागले असून यामुळे आता अतिरिक्त पंप बसविण्याचा आदेश आमदारांनी दिलेले आहेत. यामुळे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अतिरिक्त पंप बसून जास्त पाण्याचा पुरवठा प्रकल्पाला करण्यात येणार आहे.
पाटबंधारे दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत केरी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्वपदावर येण्याची आशा अधिकाऱयांनी व्यक्त केलेली आहे.









