भारताकडे मोठी क्षमता असल्याचा इस्रो प्रमुखांचा दावा : आर्थिक बळ देण्याची अपेक्षाही व्यक्त
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
भारताकडे अवकाश क्षेत्रात मोठी झेप घेण्याची क्षमता असून चंद्राबरोबरच मंगळ आणि शुक्र या ग्रहांवर जाण्याची इस्रोची तयारी आहे, असे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले. सद्यस्थितीत आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. तसेच अवकाश क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक गुंतवणूक वाढवून इस्रोला आर्थिक बळ देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ रविवारी केरळमधील मंदिरात पोहोचले. तिऊअनंतपुरममधील पूर्णिकावू भद्रकाली मंदिरात त्यांनी पूजा व प्रार्थना केली. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारतामध्ये चंद्र, मंगळ आणि शुक्र या ग्रहांवर जाण्याची क्षमता आहे, परंतु आम्हाला आमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल, असे सांगितले. तसेच अवकाश क्षेत्रातील कामगिरीतून संपूर्ण देशाचा विकास व्हावा, हे आमचे ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यास आम्ही बांधील आहोत. चांद्रयान-3 मोहिमोतील सर्व यंत्रणा अतिशय व्यवस्थितपणे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चांद्रयान-3 मोहिमेतील लँडर आणि रोव्हर अतिशय चांगल्या स्थितीत असून त्यावरील पाचही उपकरणे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ते आता इस्रोच्या सेंटरमध्ये डेटा पाठवत आहेत. या मोहिमेचे आयुष्य संपण्याच्या काही दिवस आधी त्याचे सर्व प्रयोग पूर्ण होतील. 3 सप्टेंबरपूर्वी म्हणजे मोहीम यशस्वी झाल्यानंतरच्या केवळ 10 दिवसांत आम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी पूर्ण क्षमतेने सर्व प्रयोग पूर्ण करू, अशी आशाही इस्रो प्रमुखांनी व्यक्त केली.
नामकरणाबाबतही स्पष्टीकरण
चांद्रयान-3 च्या टचडाऊन पॉईंटला ‘शिवशक्ती’ असे संबोधले जात आहे. तसेच चांद्रयान-2 च्या पाऊलखुणा उमटलेले ठिकाण ‘तिरंगा’ या नावावे ओळखले जाणार आहे. यासंदर्भातही इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी भाष्य केले. पंतप्रधानांनी आपल्या सर्वांसाठी योग्य अशाप्रकारे त्याचा अर्थ स्पष्ट केला. यात काही गैर नाही असे मला वाटते. दोन्ही नावे अर्थपूर्ण असून आपण जे करतोय त्याला महत्त्व असायला हवे आणि देशाचा पंतप्रधान म्हणून नावे ठेवणे हा त्याचा विशेषाधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मी विज्ञान आणि अध्यात्म दोन्हींचाही साधक’
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी केरळमधील तिऊवनंतपुरम येथील भद्रकाली मंदिरात पूजा केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या वैयक्तिक भावनाही मनखुलासपणे व्यक्त केल्या. ‘मी एक संशोधक आहे. मी चंद्रावर संशोधन करत असतानाच अंतर्मनाचाही शोध घेतो. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा शोध घेणे हा माझ्या जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे. मी अनेक मंदिरात जातो आणि मी अनेक धर्मग्रंथ वाचले आहेत. मी माझ्या अस्तित्वाचा आणि विश्वातील आपल्या प्रवासाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग असून बाह्या जगाचा शोध घेण्यासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात काम करतो, तर अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी मंदिरांमध्ये जातो’ असे हास्यवदनाने स्पष्ट केले.









