चर्चिल आलेमाव यांचे मत : आमदार विजय सरदेसाई यांनी याकामी पुढाकार घ्यावा
मडगाव : पश्चिम बगलरस्त्यावर मुंगूल ते बाणावलीदरम्यान स्टिल्ट पूल होणे गरजेचे असले, तरी म्गूंल ते खारेबांददरम्यानच्या साळ नदीतील गाळ उपसणेही तेवढेच गरजेचे असल्याचे बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे. आपल्या वार्का येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वार्का पंचायतींच्या स्थानिक पंच शेरॉन आलेमाव उपस्थित होत्या. केंद्रातील तज्ञांनी नुकतीच स्टिल्ट पूल बांधण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर वरील परिसराची पाहणी केली आहे. तसा पूल झाला तर चांगलेच आहे. मात्र त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यात अडथळा येण्याचे प्रकार थांबणार नाहीत. सदर पाण्यामुळे कोणताही त्रास न होण्यासाठी नदीतील गाळ उपसणे तेवढेच गरजेचे असल्याचे आलेमाव म्हणाले. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी याकामी लक्ष घालून पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
साळ नदीच्या कडा बांधून काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपण खारेबांद येथून वार्काच्या दिशेने रस्त्याचे रुंदीकरण करून पदपथ उभारले तसेच तळेबांध येथील पाण्याला वाहून जाण्यासाठी आवश्यक वाट ठेवली. त्यावेळी व्हॉटस्अॅपवरून आपल्या विरोधात अपप्रचार झाला होता. त्या अपप्रचारामुळे बाणावलीकरांनी आपल्याला निवडून दिले नाही. आता तेथे पाणी भरून राहण्याचे प्रकार होत नसल्याने आपण केलेले बांधकाम योग्य होते हे स्पष्ट झाले आहे, असे आलेमाव यांनी सांगितले. आपला बाणावलीवासियांवर कोणताही रोष नाही. त्यांनी कित्येकदा आपल्याला जिंकून दिल्याने आपण मुख्यमंत्री, मंत्री बनू शकलो. जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण त्यांचा सदैव ऋणी राहणार असल्याचे ते म्हणाले. आपण 19 दिवसांसाठी मुख्यमंत्री असताना तिलारी प्रकल्प, कोकण रेल्वे उ•ाणपुलासह चार महत्त्वाची विकासकामे मार्गी लावली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना आपण असोळणे, तळावली येथील पुलांची उभारणी केली. नावेली ते सिकेटी हा पूल माजी आमदार कायतू सिल्वा व आवेर्तान फुर्तादो यांनी आक्षेप घेतल्याने पूर्ण करू शकलो नव्हतो. मात्र आपण सध्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना या पुलाची पूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी उर्वरित काम पुढे नेले आहे व आता ते पूर्णत्वाकडे पोहोचले आहे, असे सांगून त्याबद्दल आलेमाव यांनी समाधान व्यक्त केले.









