बेळगाव : शाळांना सुरुवात झाली. याचबरोबर रविवारी पावसालाही सुरुवात झाल्याने शालेय साहित्याबरोबरच छत्री-रेनकोट खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे बाजारपेठ फुलून गेली होती. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजारमध्ये गर्दी दिसून आली. रविवार असल्याने पालक आपल्या पाल्यांना घेऊन खरेदीसाठी आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. रविवारी मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली. शहरासह ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आता आपणाला तसेच मुलांना छत्री आणि रेनकोट घेण्याचे ठरवून ग्रामीण भागातील जनता शहराकडे वळली होती. शाळांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, पेन, कम्पास, शालेय दफ्तर घेण्याकडे साऱ्यांनीच लक्ष दिले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महागाई वाढली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसल्याचे दिसून येत होते. छत्री-रेनकोट आणि जॅकेट यांचे दरही वाढले आहेत. मागील वर्षी दोनशे रुपये असलेली छत्री यावर्षी तीनशे रुपयांवर पोहोचली आहे. याचबरोबर विविध कंपन्यांच्या छत्र्यांचे दरही वाढले आहेत. 500 ते 600 रुपये छत्रीचा दर झाल्याचे दुकानदार सांगत होते. त्यामुळे स्थानिक कंपन्यांनी तयार केलेल्या छत्र्या खरेदीकडेच कल वाढल्याचे दिसून आले.
रेनकोट व जॅकेटच्या दरामध्येही भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग काहीसा नाराज दिसून आला. विविध कंपन्यांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे साधे जॅकेट खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली होती. कितीही महागडे जॅकेट किंवा रेनकोट घेतले तरी एक वर्षामध्ये खराब होत आहे, अशी तक्रार ग्राहक करत होते. त्यामुळे तीन ते चार महिने पाऊस असतो, त्यासाठी साधेच जॅकेट घेऊन वर्ष काढायचे, हाच विचार सामान्य ग्राहकांचा दिसून आला. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पाल्यांसह पालक बाजारात दाखल झाला होता. मुलांना शाळेतून वह्या तसेच इतर साहित्याची यादी देण्यात आली होती. खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या तसेच पुस्तकांचीही खरेदी करावी लागत होती. दरामध्ये वाढ झाल्याने पालकवर्गाच्या खिशाला कात्री लागली. महागाईमुळे त्रस्त झालेली जनता या वाढलेल्या दरामुळे आणखीच मेटाकुटीला आल्याचे दिसून आले. पावसाळी साहित्य तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे व्यावसायिकांनीही त्यांना हव्या त्या वस्तू देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ग्राहकांना विविध कंपन्यांच्या साहित्याचे दर सांगितले जात होते. आपल्या कुवतीनुसार परवडणाऱ्या वस्तूंची खरेदी ग्राहकांनी यावेळी केली. एकूणच रविवारी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली.









