मागील काही दिवसांत तब्बल 28 टक्के वीजनिर्मितीत घट : राज्यातील ऊर्जा विभाग संकटात
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यात यावर्षी मर्यादित पाऊस झाल्याने वीज निर्मितीची क्षमता घटली आहे. जल व औष्णिक स्रोतापासून निर्माण केली जाणारी वीज कमी झाली असतानाच आता सौर व पवन ऊर्जेतून मिळणारी वीजही कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जा विभाग संकटात सापडला आहे. हायड्रो, थर्मल, सोलार पॉवर यासह जल विद्युत प्रकल्पांतून वीज निर्मिती केली जाते. सध्या 31,669.41 मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे वीज निर्मितीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आता खराब हवामानाचा पारंपरिक ऊर्जा स्त्राsताना दणका बसू लागला आहे. मागील काही दिवसांत तब्बल 28 टक्के वीज निर्मितीत घट झाल्याचे समोर आले आहे. राज्यात दररोज पवन ऊर्जेद्वारे अंदाजे 4000 मेगावॅट वीज निर्मिती होत होती. परंतु सप्टेंबरपासून वाऱ्याचा वेग कमी झाल्याने 500 ते 550 मेगावॅटपर्यंतच पवन ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जात आहे. तर दुसरीकडे दररोज 5000 मेगावॅट सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केली जात होती. परंतु सध्या ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे 3500 ते 4000 मेगावॅट इतकीच वीज सौर ऊर्जेद्वारे निर्माण केली जात आहे. सन 2020 ते 2023 यादरम्यान अनेक वसाहती, औद्योगिक प्रकल्प, हॉटेल उभी राहिल्याने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. मागील तीन वर्षांत तब्बल 32 टक्क्यांनी विजेच्या मागणीत वाढ झाली. परंतु उत्पादन मात्र 13 टक्क्यांनी घसरले आहे. पाऊस व कोळशाच्या तुटवड्यामुळे रायचूर, उडुपी, बेळ्ळारी येथील वीज निर्मिती केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. याचा परिणाम वीज निर्मितीवर होत आहे.
पारंपरिक ऊर्जा स्त्राsतांचा अधिकाधिक वापर करा
हवामानातील बदलामुळे पवन ऊर्जा निर्मितीत लक्षणीय घट झाली. अपेक्षेप्रमाणे सौर ऊर्जेचे उत्पादनही झालेले नाही. सध्या औष्णिक वीज निर्मितीत सुधारणा झाली असून दोन दिवसांत विजेचा प्रश्न सुटणार आहे. नागरिकांनी पारंपरिक ऊर्जा स्त्राsतांचा यापुढील काळात अधिकाधिक वापर करावा.
-प्रवीणकुमार चिकार्डे, अधीक्षक अभियंते हेस्कॉम









