कोनराड संगमा यांचा मेघालयमध्ये दावा, त्रिपुरात माणिक सहा यांचा राजीनामा
शिलाँग / वृत्तसंस्था
मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) नेते कोनराड संगमा यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला राज्यातील 60 पैकी 26 जागा मिळाल्या आहेत. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सरकारमध्ये आम्ही समाविष्ट होऊ इच्छितो असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मेघालयसह ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या परिणामांची घोषणा गुरुवारी करण्यात आली.
आपल्याला भाजपने आधीपासूनच समर्थन दिले आहे. शिवाय अन्य काही छोटे पक्ष आपल्यासह आहेत. अशाप्रकारे आपल्याला 32 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. साहजिकच आपण सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला आहे, अशी माहिती कोनराड संगमा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजपचेही समर्थन
मेघालय राज्य भाजप शाखेचे अध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनीही संगमा यांना समर्थन दिले. एनपीपीला 34 आमदारांचे समर्थन आहे. त्यात भाजपचेही आमदार आहेत. त्याशिवाय स्टेट पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे. संगमा यांना आणखी काही आमदारांचा पाठिंबा मिळणेही शक्य आहे.
त्रिपुरा ः माणिक सहा यांचा राजीनामा
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी आपल्या सरकारचा राजीनामा दिला आहे. त्रिपुरात भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत स्वबळावर मिळविले आहे. त्यामुळे त्या राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 8 मार्चला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदी पुन्हा सहा यांची नियुक्ती केली जाते की आणखी कोणाची, हा उत्सुकतेचा विषय आहे. काही जाणकारांच्या मते केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी केली जाऊ शकते. 1977 पासून ज्या धनपूर मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कधीही पराभव झाला नव्हता, तेथे यावेळच्या निवडणुकीत भौमिक या निवडून आल्या आहेत. त्या केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढविल्याने त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. मात्र खरी परिस्थिती 8 मार्चलाच समोर येणार आहे.
भाजपला 32 जागा
त्रिपुराचा विधानसभा निवडणूक परिणामही गुरुवारी घोषित झाला आहे. भाजपला एकंदर 32 जागा मिळाल्या असून भाजपचा मित्रपक्ष असणाऱया आयपीएफटीने 1 जागा जिंकली. मार्क्सवादी कमुनिस्ट पक्षाने काँगेसला बरोबर घेऊन निवडणूक लढविली होती. तथापि, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाच्या दोन जागा कमी झाल्या. काँगेसलाही केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.
‘तिपरा’चा झटका
त्रिपुरामध्ये विरोधी पक्षांना सर्वात मोठा झटका नव्यानेच स्थापन करण्यत आलेल्या तिपरा मोथा पक्षाने दिला आहे. पूर्वीच्या राजघराण्याचे वंशज प्रद्योत किशोर देबबर्मा यांनी हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाला प्रथम प्रयत्नातच 13 जागांचे घसघशीत यश मिळाले. तथापि, भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने सत्तासूत्रे या पक्षाच्या हाती आली नाहीत. निवडणूक परिणाम घोषित झाल्यानंतर भाजपने या पक्षाशीही जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. या पक्षाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येईल अशी हमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.
तृणमूलचा दारुण पराभव
शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने सत्ताधीश असणाऱया तृणमूल काँगेसचा मात्र त्रिपुरात दारुण पराभव झाला आहे. या पक्षाने 28 जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र एकही जागा पदरात पडली नाही. तसेच या पक्षाला केवळ 0.88 टक्के, म्हणजे नोटापेक्षाही कमे पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.









