कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या?
कोल्हापूर : अलमट्टी धरण प्रशासन केंद्रीय जल आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत आहे. 517 फुटांवर पाण्याची पातळी ठेवायची नसतानाही ठेवली जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या वारंवार निदर्शनास आणूनही त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. अलमट्टीची पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यात सरकार आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी सपशेल फेल ठरल्याचा आरोप इंडिया आघाडी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली अलमट्टी धरणाची उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची बुधवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.
अलमट्टी धरणातील फुग वाढल्याने कोल्हापूर, सांगली जिह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागते. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप करत कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या पाटबंधारे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले.
कोल्हापूर, सांगलीमध्ये पूर येऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या, असा सवाल करत 15 मे नंतर अतिवृष्टीचा हवामान खात्याने अंदाज दिला होता. आता 25 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. तरी देखील धरणामध्ये 70 ते 80 टक्के साठा का ठेवला आहे, असा सवालही करण्यात आला.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. जनता आणि सरकारची समन्वय समिती झाली पाहिजे. पुरावेळी विसर्गाचे योग्य नियोजन करावे. प्रशासकीय पातळीवर काही अडचणी असल्यास सांगावे. केंद्रीय पातळीवर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
अलमट्टीमध्ये नेमका साठा किती, उंची किती ही खरी माहिती समजून येत नाही. घरे आणि शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक प्रशासनाने समन्वय साधून प्रश्न मार्गी लावला पाहिजे. महापुरामुळे कोल्हापूर, शिरोळ, सांगली जिह्यातील पिके कुजत असतात. त्यासाठी काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
महापुरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. सांगलीचे अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी हिप्परगी, अलमट्टी धरणाच्या विसर्गाची माहिती सांगितली. तीन शिफ्टमध्ये येथे आठ अधिकारी कार्यरत असून करडी नजर ठेवली जात असल्याचे सांगितले.
अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गाचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण केले. समितीचे विजय देवणे म्हणाले, अलमट्टी प्रश्नी पाटबंधारे विभाग अपयशी ठरल्याचे मान्य करावे. या प्रश्नी सर्वपक्षीयांना घेऊन लवकरच पुढील दिशा ठरविली जाईल. समितीचे विक्रांत पाटील, सर्जेराव पाटील, व्ही. बी. पाटील, दिलीप पोवार, बाबासाहेब देवकर, धनाजी चुडमुंगे, कॉ. चंद्रकांत यादव, बाजार समितीचे संचालक भारत पाटील, सुभाष देसाई, अनिल घाटगे आदींनी मते मांडली. यावेळी कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी प्रशासनाची बाजू मांडली.
ही काय देशाविरोधात माहिती आहे काय? : राजू शेट्टींचा सवाल
चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, आम्हाला काही मर्यांदा आहेत. माझे काम सरकारला अहवाल देण्याचे आहे. आमच्या विभागाने पूर नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहे, त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविली असल्याचे सांगितले. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अलमट्टीची उंची आणि पाटबंधारे विभागाने पूर्ण माहिती द्यावी. त्यात ही काय देशविरोधी माहिती आहे का, तुम्ही त्यातील तज्ञ आहात, आंतरराज्य समन्वयक आहात, असे मत राजू शेट्टी यांनी मांडले आहे.








