69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : ‘सरदार उधम’अन् आरआरआर’ला मोठे यश ’एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी प्रामुख्याने 2021 मध्ये प्रदर्शित चित्रपटांचा विचार करण्यात आला आहे. ‘सरदार उधम’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि क्रीति सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळणार आहे. यंदा जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये पुष्पा द राइज, द काश्मीर फाइल्स, गंगुबाई काठियावाडी आणि आरआरआर या चित्रपटांचा वरचष्मा दिसून आला आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर दोन मराठी चित्रपटांवर स्वत:चे नाव कोरले आहे. ‘एकदा काय झालं’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटासाठी निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला नर्गिस दत्त अवॉर्ड राष्ट्रीय एकता सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत विजेता म्हणून निवडले गेले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी यंदाच्या ज्युरींमध्ये यतेंद्र मिश्रा, केतन मेहता, नीरज शेखर, वसंत साई आणि नानून भसीन यांचा समावेश होता. विक्की कौशलची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘सरदार उधम’ आणि आर. माधवन याचा चित्रपट ‘रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट’ची सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवड झाली आहे. ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता, तर ‘रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट’ चित्रपटगृहांमध्ये झळकला होता. ‘पुष्पा-द राइज’ या तेलगू चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि क्रीति सेनॉनला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळणार आहे. दिग्दर्शिका श्रृष्टी लखेरा यांच्या ‘एक था गाव’ची सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपट म्हणून निवड झाली आहे. चित्रपटनिर्माते नेमिल शाह यांच्या गुजराती भाषेतील ‘दाल भात’ची सर्वोत्कृष्ट लघूपट (फिक्शन) म्हणून निवड झाली आहे.
पुरस्कारविजेते
- पुरस्कार विजेते/विजेत्या
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट, क्रीति सेनॉन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका श्रेया घोषाल (तमिळ चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक काल भैरव (आरआरआर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी (मिमी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन (गोदावरी)
- सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट अनूर
- सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट कलकोक्यो-हाउस ऑफ टाइम
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट छेल्लो शो
- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट 777 चार्ली
- सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट समांतर
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट एकदा काय झालं
- सर्वोत्कृष्ट अॅक्शनदृश्यं आरआरआर
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन आरआरआर
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आरआरआर
- स्पेशल ज्युरी अवॉर्ड शेरशाह (दिग्दर्शक विष्णू वर्धन)
- सर्वोत्कृष्ट गीतलेखन कोंडा पालम (गीतकार चंद्र बोस)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन पुष्पा (देवी श्री प्रसाद)
- सर्वोत्कृष्ट संकलन गंगुबाई काठियावाडी (संजय लीला भन्साळी)
- सर्वोत्कृष्ट पटकथा नयातू (मल्याळी), गंगूबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट व्हिडिओग्राफी सरदार उधम
- सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेट्री द नंबी इफेक्ट









