उच्च न्यायालयाचा दिलासा, मृत महिलेचा पती तक्रार मागे घेण्यास तयार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘पुष्पा-2’ या चित्रपटाच्या प्रिमियर प्रसंगी संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाकडून त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन संमत करण्यात आला आहे. 4 डिसेंबरला घडलेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. रेवथी असे या महिलेचे नाव असून ती 35 वर्षांची होती. तिचा चार वर्षांचा पुत्रही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार होत आहेत, अशी माहिती देण्यात आली होती.
शुक्रवारी पोलिसांनी अर्जुन याला त्याच्या घरी जाऊन अटक केली होमी. यावेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. त्याला पोलिसांच्या वाहनातून पोलीस स्थानकात नेण्यात आले. पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रिमिअर शो प्रसंगी या चित्रपटगृहात अर्जुन त्याच्या अंगरक्षकांसह उपस्थित होता. त्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे प्रचंड चेंगराचेंगरी होऊन अनेकजण जखमी झाले होते.
अनुमतीचा प्रश्न
अर्जुन याने चित्रपटगृहाला दिलेली भेट अचानक होती की त्याने आधी अनुमती घेतली होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संध्या चित्रपटगृहाने गर्दीच्या नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केली नव्हती, असे प्राथमिक तपासात आढळले आहे. मात्र, या चित्रपटगृहाच्या प्रशासनाला तो येत असल्याची माहिती देण्यात आली होती, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चार जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना आतापर्यंत अटक केली आहे. चित्रपटगृहाच्या भागिदारासह तिघांना आधीच अटक करण्यात आली आहे. अर्जुन यालाही अटक करण्यात आली होती पण आता तो जामिनावर मुक्त आहे. त्याच्या त्याच्यासह चार जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. अर्जुन याच्या अंगरक्षकांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अर्जुन याला कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले होते. या न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. तथापि, नंतर काही तासातच उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामिनाचा दिलासा दिला.
उच्च न्यायालयात मागितली दाद
आपल्याविरोधातील आरोप रद्द करावेत अशी मागणी करणारी याचिका अल्लू अर्जुन याने उच्च न्यायालयात सादर केली चेंगराचेंगरीचा प्रसंग घडल्यानंतर सादर केली होती. या प्रकरणात आपला काहीही दोष नसून आपण चित्रपटगृहाला भेट देण्यापूर्वी आणि भेटीच्या वेळीही सर्व नियमांचे पालन केले होते, असे या अभिनेत्याने याचिकेत स्पष्ट केले होते. अखेर त्याला दिलासा मिळाला.
तक्रार मागे घेण्यास तयार
चेंगराचेंगरीत मृत झालेल्या महिलेच्या पतीने अल्लू अर्जुनवरील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. अर्जुनने या महिलेच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये हानी भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तथापि, एकदा तक्रार केल्यानंतर आणि पोलीस तपासाचा प्रारंभ झाल्यानंतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये तक्रार मागे घेता येत नाही. त्यामुळे तसा प्रयत्न केला गेल्यास तो वाया जाण्याची शक्यता आहे.









