सील अत्यावश्यक : मेट्रो परिसरात दारू पिण्यावर बंदी कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डीएमआरसी आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेत दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांना दारूच्या दोन बाटल्या नेण्यास मान्यता दिली आहे. मात्र, प्रवाशांना फक्त सीलबंद दारूच्या बाटल्या सोबत घेता येतील. तसेच मेट्रोमध्ये मद्यप्राशन केल्यास किंवा दारूच्या नशेत असभ्य वर्तन केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही ‘डीएमआरसी’कडून प्रवाशांना देण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ मेट्रोच्या एअरपोर्ट लाईनवरच दारूची सीलबंद बाटली घेऊन जाण्याची परवानगी होती. आता हा नवा आदेश सर्व मेट्रो मार्गांवर लागू होणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक निवेदन जारी करून नवीन नियमावली स्पष्ट केली आहे. तसेच मेट्रो प्रवाशांना प्रवास करताना योग्य शिष्टाचार पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दारूच्या नशेत कोणताही प्रवासी गैरवर्तन करताना आढळल्यास कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले आहे. यासंबंधी ‘सीआयएसएफ’ला मार्गदर्शक सूचनाही पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सीआयएसएफ प्रवाशांना चेकिंगदरम्यान सीलबंद दारूच्या दोन बाटल्या घेऊन जाण्यापासून रोखणार नाही. मात्र, संशय वाटल्यास योग्य तपासणी करण्याचे अधिकार सीआरपीएफच्या जवानांना देण्यात आले आहेत.









