तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे मागणी
खानापूर : खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना तालुक्यातील वाळू, वीट व्यवसायावर घालण्यात आलेले निर्बंध त्वरित मागे घ्यावे आणि या व्यवसायास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन ब्लॉक काँग्रेसच्यावतीने गुरुवारी सकाळी देण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, नगरसेवक प्रल्हाद मादार, महांतेश राऊत, प्रसाद पाटील, सावित्री मादार, नगरसेवक तोईद चांदकन्नावर यासह इतर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठाकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले. नुकतेच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी तालुक्यात वाळू तसेच माती आणि खनिजाची अवैद्य वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वीट व्यावसायिकांवर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. यासाठी वीट व्यवसायाला पूरक वाळू आणि मातीची वाहतूक करण्यास मुभा देण्यात यावी, खानापूर तालुक्यातील जनतेचा वीट व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय असल्याने या व्यवसायावरच लोकांची उपजीविका होत असते. यासाठी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करून माती आणि वाळू वाहतुकीस परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.









