अझमनगर-शाहूनगरातील बैठ्या विक्रेत्यांची मागणी : आयुक्तांना निवेदन
बेळगाव : अझमनगर शेवटचा थांबा व शाहूनगरातील पहिला थांबा येथील रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बैठ्या विक्रेत्यांनी महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली आहे. बैठ्या विक्रेत्यांनी मनपावर जाऊन निवेदन दिले. शहर अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी निवेदनाचा स्वीकार केला. अझमनगर व शाहूनगर येथील बसथांब्याच्या बाजूला बैठे विक्रेते मागील 15 ते 16 वर्षांपासून भाजीपाला विक्री करून गुजरान करीत आहोत. महापालिकेने रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अवलंबिले आहे. शाहूनगर येथील तिसरा क्रॉसजवळ व्यापार करा या प्रकारची सूचना करण्यात आली आहे. पण याठिकाणी व्यापार होत नाही. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न आला आहे. महापालिकेने पूर्वीप्रमाणेच अझमनगर शेवटचा थांबा व शाहूनगर येथील पहिला थांबा येथील रस्त्याच्या बाजूस भाजीपाला विक्रीस मंजुरी दिल्यास बैठे विक्रेत्यांना व्यापार करणे सुलभ होईल असे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महादेवी लमाणी, सुमित्रा राठोड, संतोष लमाणी, काशव्वा राठोड, शांतव्वा लमाणी, रुक्मिणी राठोड आदी निवेदन देताना उपस्थित होते.









