ग्रामस्थांचे अनेक अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अलतगा येथील जागृत देवस्थान श्री महालक्ष्मी यात्रोत्सव एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे यात्रेसाठी अलतगा ग्रामस्थ सज्ज झाले असून विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्तांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. एप्रिल 25 रोजी अलतगा येथे तब्बल 75 वर्षानंतर ऐतिहासिक श्री महालक्ष्मी यात्रा होत आहे. परवान्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना केपिसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात येत आहेत. सोमवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी विविध समस्या मांडल्या.
अलतगा गावचे आंतरिक रस्ते, पाणी, विद्युत, पोलीस सहकार्य व मूलभूत समस्या असतील त्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मलगौडा पाटील यांनीही यात्राकाळात नागरिकांना कोणताही त्रास होवू नये यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अलतगा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, धर्मादायी व मुजराई इलाखा आयुक्त, तहसीलदार, काकतीचे पोलीस निरीक्षक, हेस्कॉम ग्रामीण अधिकारी प्रवीण कुमार चिकार्डे, हेस्कॉम सेक्शन ऑफिसर हिंडलगा शिंगे या सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, देवस्थान कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, सदस्य गणपत सुतार, पिराजी पावशे, मानव बंधुत्व वेदिकेचे अध्यक्ष विजय तळवार आदी उपस्थित होते.
आज हेस्कॉमचे अधिकारी करणार सर्व्हे
यात्रा काळात गावातील वीज व्यवस्था व इतर समस्या जाणून घेण्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी मंगळवारी गावात भेट देवून पाहणी करणार आहेत. यात्रेवेळी लक्ष्मीदेवीचा रथ फिरताना कोणते खांब व वायर काढाव्यात, तसेच रथ फिरविताना अडचण होणार नाही यासाठी रस्त्यांची पाहणी करणार आहेत.









