जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना
बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उन्हाळ्यात अंतर्जल पातळी राखणे गरजेचे आहे, असे असले तरी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदण्यास परवानगी देण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अंतर्जल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे कूपनलिका खोदाईवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पिण्याच्या पाण्यासाठी खासगी कूपनलिका व विहिरींचा आधार घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदाई करण्यासाठीच परवानगी देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. याबरोबरच त्वरित वीजसंपर्क उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. निवडणुकीच्या आचारसंहितेचा दुष्काळ निवारणावर कोणताही परिणाम होणार नाही. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश आदी उपस्थित होते.









