मानवाधिकार साहाय्यता संघाची तहसीलदारांकडे मागणी
बेळगाव : आधार कार्डसंबंधीची सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी बिजगर्णी ग्रा. पं. कार्यक्षेत्रात आधारकार्ड शिबिर भरविले जाणार आहे. या शिबिराला परवानगी द्यावी, अशी मागणी मानवाधिकार साहाय्यता संघातर्फे तहसीलदार बसवराज नागराळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बिजगर्णी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य लोकांच्या आधारकार्डसंबंधीची सर्व कामे करण्यासाठी हे शिबिर घेतले जाणार आहे. यामध्ये आधारकार्ड अपडेट, नाव दुरुस्ती, मोबाईल नंबर यासह इतर आधारकार्ड दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. बिजगर्णी परिसरातील नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्डसाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक जीवनावर परिणाम होत आहे. यासाठी बिजगर्णी येथे आधारकार्ड शिबिर भरविले जाणार आहे, याला परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष अखिल कांबळे यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.









