सातारा :
सातारा शहरात नगरपालिकेने नो हॉकर्स झोन केला होता. त्या नो हॉकर्स झोनमधील व्यवसायिकांना तेथून पर्यायी जागा दिली होती. त्या पर्यायी जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागेचे वाटप शुक्रवारी दुपारी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले. एकूण 26 व्यावसायिकांना जागा वाटप करण्यात आले. नो होकर्स झोनमधील व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा शहरात सदाशिव पेठेतील मोती चौक ते 501 पाटी यादरम्यान नो हॉकर्स झोन सातारा नगरपालिकेने मे महिन्यात जाहीर केला होता. त्यानंतर तेथील हॉकर्सधारकांना नोटीस बजावून उठवण्यात आले होते मात्र काही हॉकर्सधारकांनी त्यास विरोध आंदोलन केले होते. तर हॉकर्स संघटनेने ही जे नो हॉकर्समध्ये व्यवसाय करतात त्यांच्यावर पालिका कारवाई करायला गेल्यानंतर विरोध केला होता. तेव्हा हॉकर्स संघटनेचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना भेटले होते. मुख्याधिकाऱ्यांनी पर्यायी जागा सुचवली होती. त्या पर्यायी जागेचे वाटप शुक्रवारी दुपारी सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात चिठ्ठ्या टाकून करण्यात आले.
यावेळी अतिक्रमण विभागाचे विभाग प्रमुख प्रशांत निकम, हॉकर्स संघटनेचे सातारा शहराध्यक्ष संजय पवार यांच्यासह हॉकर्स समितीचे सदस्य व व्यावसायिक उपस्थित होते. चिठ्ठ्या टाकून 26 व्यावसायिकांना जागेचे वाटप केले. जागावाटप झाल्याने व्यावसायिकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण होते.








