कॅन्टोन्मेंट भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात : फिक्सिंग झालेल्या उमेदवारांचीच होतेय निवड
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट कार्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र भरती प्रक्रियेवेळी सर्व नियम व निवड प्रक्रिया धाब्यावर बसवून केवळ फिक्सिंग झालेल्या उमेदवारांचीच निवड करण्यात येत आहे. भरतीसाठी मोठी रक्कम घेण्यात येत असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट वर्तुळात खळबळ माजली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत 2 वर्षांपूर्वी संपुष्टात आली आहे. सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. कॅन्टोन्मेंटची निवडणूक होईल की, नाही याबाबत सांशकता निर्माण झाली आहे.
कॅन्टोन्मेंटचा समावेश महापालिकेत करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. हा प्रस्ताव स्थानिक महापालिकांकडे पाठविण्यात आला आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील नागरी वसाहतीचा समावेश महापालिकेत करण्यासाठी प्रस्ताव महापालिकेकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर अद्याप चर्चा झाली नाही. मात्र याच दरम्यान कॅन्टोन्मेंट कार्यालयातील रिक्त जागा भरून घेण्यासाठी
कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी आटापिटा चालविला आहे. कॅन्टोन्मेंटच्या नागरी वसाहतीचा समावेश महापालिकेत करण्याचा प्रस्ताव असताना भरती कशाला, असा मुद्दा उपस्थित होत आहे. पण भरती प्रक्रियेमागे आर्थिक गणित असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्वच्छता निरीक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. लेखी परीक्षेत पास झालेल्या तीन उमेदवारांची यादी नोटीस फलकावर लावण्यात आली. त्यानुसार तिन्ही उमेदवारांना स्किल टेस्टला उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र यापैकी एक उमेदवार गैरहजर राहिला तर 2 उमेदवार स्किल टेस्टला उपस्थित होते. यापैकी एका उमेदवाराचे शिक्षण या पदासाठी योग्य असूनदेखील स्किल टेस्टमध्ये आणि लेखी परीक्षेत एकही उमेदवार पात्र नसल्याचे
कॅन्टोन्मेंटकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे या पदासाठी अर्ज केलेल्या चौधरी नामक उमेदवाराने निवड प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला आहे. चांगले शिक्षण असून, परीक्षा व्यवस्थित देऊनही पात्र उमेदवार नसल्याचे कॅन्टोन्मेंटने जाहीर केले आहे. कॅन्टोन्मेंटमधील प्रत्येक पदावर निवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जात असल्याचा आरोप केला आहे. याबाबत चौकशी करावी, अशा मागणीची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पदासाठी 12 लाखापर्यंत बोली
भरती प्रक्रियेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने खळबळ माजली आहे. प्रत्येक पदावर निवड करण्यासाठी लाखाच्या घरात रक्कम घेतली जात असल्याची चर्चा सुरू आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पदासाठी 12 लाखापर्यंत बोली लागल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक रक्कम देणाऱ्या कर्मचाऱ्याची निवड करण्यात येत असून चाचण्या, परीक्षा, आणि निवड प्रक्रिया हा केवळ दिखाऊपणा असल्याचा आरोप अर्ज केलेल्या उमेदवारांनी केला आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, कॅन्टोन्मेंट कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून सदर्न कमांड पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित उमेदवारांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. कॅन्टोन्मेंटमधील पदे भरती करण्यात येत नसून येथील पदे विक्री करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकाराची सखोल चौकशी करून यापूर्वी भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









