आकें बायशचे माजी सरपंच विनायक सरदेसाई यांचा दावा : गरज पडल्यास अब्रुनुकसानीचा दावा
मडगाव : आकें बायश पंचायतीचे माजी सरपंच विनायक सरदेसाई यांनी आपल्याविऊद्ध पंच नासियो डायस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आवश्यकता भासल्यास आपल्यावर खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली. एका इंग्रजी दैनिकात पंच डायस यांनी एका बंगल्याला राबित्याचा दाखला देताना मी पंचायत मंडळाला विश्चासात न घेता अंधारात ठेवल्याचा आरोप केलेला आहे, असे सरदेसाई यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणासंदर्भात मी पंचायत मंडळाला अंधारात ठेवले असे ते म्हणत असले, तरी त्यात तथ्य नाही. एका बंगल्यासंदर्भातील सदर प्रकरण गटविकास अधिकाऱ्यांसमोर होते आणि गटविकास अधिकाऱ्यांनीच त्या प्रकल्पाला राबित्याचा दाखला देण्याचे निर्देश दिले होते, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.
यासंदर्भात एका बैठकीत पंच डायस यांनीच गटविकास अधिकाऱ्यांच्या निवड्याच्या विरोधात वरिष्ठ अधिकारिणीकडे दाद मागण्याची सूचना केली होती. मग त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रश्न कुठे येतो, असा सवाल सरदेसाई यांनी केला. आपण सरपंच असताना ज्या कोणाला राबित्याचे दाखले पुरविले आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहूनच दिले आहेत. यापूर्वी लोकांची राबित्याचे दाखले तसेच अन्य अर्ज व कामांसंदर्भात अडवणूक करण्याचे प्रकार सुरू होते. त्याद्वारे पैसे उकळण्याचे प्रयत्न होत असत. मात्र मी सरपंच झाल्यानंतर सर्व कामे सुरळीत होऊ लागल्याने काहींच्या पोटात दुखले व प्रथम उपसरपंचांवर व नंतर माझ्यावर अविश्वास ठराव आणून पायउतार केले गेले, असा दावा त्यांनी केला. असे असले, तरी पंच म्हणून आम्ही आमचे कार्य करणार आहोत. कोणालाही गैरव्यवहार करू देणार नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सरपंच म्हणून सरदेसाई यांनी नेहमीच कायद्यानुसार कामे केली आहेत व कोणाकडूनही पैसे घेऊन कामे केलेली नाहीत तसेच बेकायदा बाबींना थारा दिलेला नाही, असे माजी उपसरपंच अमिषा तिळवे यांनी यावेळी सांगितले.









