सांगली :
सरकारी घाटाजवळ सुरू असलेले ढोल पथकांचे वादन बंद करण्याची मागणी होत आहे. नुकतेच परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल्याची बातमी प्रसिद्ध झाली. पण ज्या ढोल ताशा ध्वजाचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीपासूनचा आहे. अशा वादन संस्कृतीला विरोध का? त्यासाठी प्रथम ढोल-ताशा व ध्वजाचा इतिहास काय आहे ते ही जाणून घेणे गरजेचे आहे.
ढोल-ताशा व ध्वज हे पूर्वीच्या काळात युद्धात वापरले जाणारे, संकेत देणारे, हजारो सैनिकांना संवाद साधणारे, एकत्र करणारे साधन, शस्त्र होते. याचा युद्धात उपयोग करत. असा शेकडो वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास याला लाभला आहे. जेव्हा शाहिस्तेखानाने पुण्यात येऊन स्वराज्याची नासधूस चालवली. लालमहालामध्ये जाणेसुद्धा अवघड होते. त्यावेळी एका लग्नाचा सोहळा दाखवून ढोल वाजवत शिवराय व मावळ्यांनी पुण्यात प्रवेश केला होता व शाहिस्तेखानाची बोटी तोडली, असा इतिहास आहे. कालांतराने यामध्ये बदल घडत गेले व ढोलाची संस्कृती कुठेतरी जाऊन थांबली. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात लोक एकत्र येण्यासाठी व एकोपा निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी, लो. टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेशाच्या स्वागतासाठी ढोल, लेझीम वाजू लागले.
१९६५ साली पुण्यामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व पोलिसांनी ढोल लेझीम वाजवण्यास बंदी घातली. त्यावेळी आप्पासाहेब पेंडसे हे स्वतः गळ्यात ताशा बांधून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन ताशा वाजवू लागले व लोकांनीही त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर १९७५ साली पहिल्या ढोल ताशा पथकाची सुरुवात झाली व आज सर्वत्र ढोलपथक आहेत. त्यामुळे ढोल ताशा पथकांना सांस्कृतिक, पारंपरिक वारसा लाभला आहे.
दरवर्षी पारंपरिक ढोल पथकांवरून होणारा विरोध दिसून येतो. सण-उत्सवांच्या पारंपरिक पद्धती जपताना विरोध होतो, ही शोकांतिका आहे. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला पर्याय म्हणून ढोलपथके सुरू झाली, पण आजही त्यांवर आक्षेप घेतले जातात. ढोलांचा आवाज डेसिबलच्या मर्यादेत असतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही इथे गैरलागू ठरतो. यावर पथकांसह सर्व समाजाने एकत्रित येऊन तोडगा काढण्याची गरज असल्याचे काही वादकांनी बोलून दाखविले.
- एकतेचे प्रतीक
या ढोलपथकांमध्ये केवळ मनोरंजनच नाही, तर येथे सर्व जाती-धर्मांची मुलं-मुली एकत्र येऊन वादन करतात. हीच तर खरी शिवरायांची शिकवण आहे. एकोपा, समानता आणि बंधुभाव याच मूल्यांची आम्ही पथकात जोपासना करतो. महिलांचा सन्मान व त्यांना समाजात योग्य स्थान कसे द्यावे, हे आम्ही शिकवतो. युवा पिढीला व्यसनांपासून, मोबाईल गेमिंगसारख्या विळख्यातून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यांना विधायक कामात गुंतवून, त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवण्याचा ध्यास आम्ही बाळगतो. हीच मुलं रक्तदान शिबिरे घेऊन सामाजिक बांधिलकी जपतात. परवाच पथकातील ३५ तरुणांनी रक्तदान केले, ही काही साधी गोष्ट नाही.
-अभिजीत ओतारी, शिवतांडव पथक
- बदलाला विरोध की प्रगतीचा द्वेष ?
जे लोक या ढोलपथकांना विरोध करत आहेत, त्यांना कदाचित समाज बदललेला नको आहे. त्यांना तरुण वर्ग डॉल्बीच्या तालावर दारू पिऊन अश्लील नाच करताना पहायचा आहे का? ज्यामुळे गुन्हेगारी वाढेल. पुरात किंवा नैसर्गिक आपत्त्यांमध्ये याच पथकातील मुलं-मुली पुढे येऊन लोकांना हलवण्यापासून ते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यापर्यंत मदत करतात. कोरोना काळात याच मुलांनी अहोरात्र काम केले. ही मुलं दिवसातून केवळ दोन तास सराव करतात, तेही अभ्यास आणि नोकरी सांभाळून. हेही त्यांच्या डोळ्यात खुपते?
-रोहित शिंदे, स्वरनाद पथक, मिरज.
- ही वादन परंपरा जपण्याची गरज
आधुनिक युगात ही संस्कृती किंवा परंपरा कुठेतरी लुप्त होण्याच्या सीमेवर आहे. कारण गणेशोत्सवाला डॉल्बी, बँजो यांनी विळखा घातला आहे. डॉल्बीमध्ये स्पर्धा, मंडळामध्ये स्पर्धा, अश्लील हावभाव करून नाचणे अशा स्पर्धेत भांडण होणे, व्यसन होणे साहजिकच आहे. ज्यांनी लोक व समाज एकत्र करण्यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली त्यांना आज कसे वाटत असेल हे पाहून? आणि तक्रारदार नागरिकांना याचा त्रास होत नाही का ? का मूग गिळून गप्प बसत आहेत?
-अभिषेक पाटील, महामेरू पथक, सांगली
- सांस्कृतिक-सामाजिक ऐक्याची जोपासना
ढोलपथकाची संस्कृती व परंपरा शेकडो आपल्याला वर्षापासून लाभली आहे. त्याचे जतन करणे गरजेचे नाही का? जे ढोलपथक शेकडो तरुणांना एकत्र करून सांस्कृतिक-सामाजिक ऐक्य जोपासत आहे आणि ते ऐक्य देशाच्या व राज्याच्या तरुणांच्या हितासाठी आहे. त्यातून देशातील चांगले नागरिक, संस्कृत महाराष्ट्र घडणार आहे, तर त्यांना विरोध का? ढोल पथक हे नुसते बडवणे नसून किंवा पैसे कमवण्याचे साधन नसून, १८ पगड जाती, १२ बलुतेदार समाजाला एकत्र घेऊन संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम आहे, हे या लोकांनी लक्षात घ्यावे.
-बाळासाहेब हुळळे, विघ्नहर्ता पथक, मिरज
- शासनाच्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन होत नाही
अनेक मोठ्या शहरांमध्येसुद्धा ढोलपथकांचा सराव शक्यतो घाटावरच होतो. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या सामुग्रीमध्ये ढोलवादन बसत नाही. मागच्यावर्षी तर ढोलच्या आवाजाने पुल पडेल, अशीही तक्रार केली गेली. कुठल्या बुद्धिमत्तेचे हे उदाहरण म्हणावे? पथकाचा सराव हा सायंकाळी ६ ते ९ या वेळेतच असतो. पथक शासनाच्या कुठल्याही नियमांचे उलंघन करत नाही. आम्ही आपल्या पारंपरिक वाद्याचा ठेवा जपतो.
-शीतल सदलगे, रणमर्द पथक, सांगली








