स्मार्ट सिटी कार्यालयात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 600 कोटीचा निधी खर्च करून काँक्रिटचे रस्ते निर्माण करण्यात आले. मात्र या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. तसेच संपर्क रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचारानेच ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात धरणे आंदोलन छेडून अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
शहर स्मार्ट बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी मंजूर केला होता. मात्र या निधीचा दुरूपयोग झाल्याची टीका करण्यात आली. प्रस्तावर तयार करताना वेगळय़ा कामांची यादी होती. पण प्रत्यक्षात दुसरीच कामे राबविण्यात आली आहेत. त्यामुळे या कामांची पाहणी करणे गरजेचे आहे. काँक्रिटच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तर काही ठिकाणी कामे अर्धवट असल्याने निधी वाया गेला आहे. कलामंदीर येथे बहुमजली व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. पण सदर कंत्राटदाराने खोटय़ा कामाची माहिती असलेल्या कागदपत्रांची जोडणी करून हे काम मिळविले आहे. खोटी माहिती असलेली बोगस कागदपत्रे जोडणाऱया कंत्राटदाराला निविदा मंजूर करण्यात आल्याने व्यापारी संकुलाचे काम अर्धवट झाले आहे. सदर कंत्राटदारावर कारवाई करून अन्य कंत्राटदाराकडे कामाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी करण्यात आली. तसेच कंत्राट पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले अभियंते कामाची चाचपणी व्यवस्थित करीत नाहीत. तसेच कामाकडे दुर्लक्ष केल्याने निकृ÷ दर्जाची कामे झाली असल्याचा आरोप करण्यात आला. अशा अधिकाऱयांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात आपच्या वतीने धरणे धरण्यात आली.
संबंधित अधिकाऱयांशी व कंत्राटदारांशी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.









