केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुन्हा फटकार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्षासाठी निवडणूक ‘चोरल्या’चा आरोप केला आहे. त्यांनी यासाठी बेंगळूर मध्य या लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले असून या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बनावट मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप पुन्हा एकदा ठामपणे फेटाळले आहेत. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यार्थ गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित करुन आपल्या म्हणण्याचे सादरीकरण केले. त्यांनी मतदारसूचीतील काही नावांचा उल्लेख पुरावे म्हणून केला. एका मतदाराने आपल्या घराचा क्रमांक शून्य असा दिला आहे, असे गांधी यांचे म्हणणे आहे. या म्हणण्याच्या आधारावर त्यांनी हा निवडणूक चोरल्याचा आरोप आयोगावर केला असून आयोगाला आव्हान दिले.
निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
कर्नाटकच्या राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले आहेत. राहुल गांधी जे काही पत्रकारांना दाखवत आहेत, तोच पुरावा आहे, असे त्यांचे म्हणणे असेल, तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्रासह सादर करावे, असे प्रतिआव्हान राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. आयोगाने राहुल गांधी यांना एक पत्र पाठविले असून त्यात खोटे पुरावे देण्याचे कायदेशीर परिणाम काय होतात, याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता गांधी काय उत्तर देतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
गांधी यांचे आणखी आरोप
कर्नाटकात 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष 16 ते 18 जागा जिंकेल असे अनुमान होते. प्रत्यक्षात पक्षाला या अनुमानाच्या केवळ निम्म्याच, अर्थात 9 जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाचा मध्यस्थ म्हणून काम केले. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक गमवावी लागली. आयोगाने भारतीय जनता पक्षासाठी काम केले आणि मतदारसूचीत बनावट नावे मोठ्या प्रमाणात घुसविली, असे त्यांचे म्हणणे आहे.
बेंगळूर मध्य मतदारसंघ
या मतदारसंघात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी महादेवपुरा या एका विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पी. सी. मोहन यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्क्य मिळाले. मात्र, इतर सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मताधिक्क्य मिळाले आहे. असे कसे होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. याचाच अर्थ या एका विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने निवडणूक चोरली आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
महाराष्ट्रात 1 कोटी बनावट मतदार
राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकही चोरल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीच्या आधी मतदारसूचीत 1 कोटीहून अधिक बनावट मतदारांचा समावेश करण्यात आला. तसेच अनेक खऱ्या मतदारांची नावे काढण्यात आली. यावरुन मतदारसूची तयार करताना निवडणूक आयोगाने किती घोटाळा केला आहे, हे स्पष्ट होते, असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.









