काँग्रेसचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिण्यात आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. सदर पत्रात यात्रेत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींची गुप्तचर विभागाकडून चौकशी होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.









