आंध्र प्रदेशात मतदान होत असताना सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि तेलगु देशमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केल्याचा आरोप राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केला आहे. अनेक ठिकाणी हे हल्ले झाले असून हिंसाचाराच्या माध्यमातून जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असाही आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
आंध्र प्रदेशात सोमवारी सर्व 25 लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. त्याचप्रमाणे 175 विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान पूर्ण झाले. त्यासमवेत तेलंगणाच्या 17 लोकसभा मतदारसंघांमध्येही मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परिणामी, आता दक्षिणेतील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानची प्रक्रिया पार पडली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.









