वाहनधारक-प्रवासीवर्गातून समाधान : बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावर अवजड वाहतुकीलाही हिरवा कंदील
वार्ताहर/कणकुंबी
जवळपास दीड दोन महिन्यापासून बंद असलेली कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नवीन पुलावरून सर्वप्रकारची वाहतूक शुक्रवार दि. 18 पासून सुरू झाली आहे. बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नवीन पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने या मार्गावरील वाहतूक दि. 1 जुलैपासून केवळ दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र आता या मार्गावरून बेळगाव-चोर्ला-गोवा वाहतूक सुरू झाल्याने वाहनधारक व प्रवासी वर्गामध्ये समाधान पसरले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहतुकीचा फज्जा उडाला होता. अवजड वाहतुकीबरोबरच बस वाहतूक पूर्णपणे बंद करून बैलूर व खानापूरमार्गे वळविण्यात आली होती.
पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही अवजड वाहने, ट्रक, टिप्पर, टेम्पो, खासगी बसेस अशाप्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांबरोबरच प्रवासीवर्गातून समाधान पसरले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रणकुंडये ते चोर्लापर्यंतच्या (गोवा हद्द) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यापूर्वी सुरू झाले. त्यामध्ये कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन असलेला जुना पूल काढून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले. वास्तविक जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या पुलाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु कंत्राटदाराने कामाच्या बाबतीत वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाल्याने तसेच कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे सदर पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला.
बंधाऱ्यांचे अडवलेले पाणी सोडल्याने रस्ता गेला होता वाहून
1 जूनला सुरू होणारे पूल, 1 जुलै उजाडला तरी पूर्ण झाले नाही. नवीन पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी नदीत मातीचा भराव टाकून पर्यायी पूल बनवण्यात आलेला होता. मात्र दरवर्षीप्रमाणे मलप्रभा नदीवर असलेल्या तोराळी व देवाचीहट्टी येथील बंधाऱ्यांचे अडवलेले पाणी अचानकपणे सोडल्याने दि. 25 मे रोजी सदर नदीतून बनवलेला रस्ता वाहून गेला. त्यामुळे दोन दिवस बंद करून रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजे दि. 8 जून रोजी सदर रस्ता पुन्हा खचला आणि वाहतूक पुन्हा बंद झाली. दोन दिवसांनी रस्ता दुरुस्तीनंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली.
सर्वच वाहतूक होती बंद
मात्र तिसऱ्या वेळी कणकुंबी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे दि. 15 जून रोजी नदीतील सगळाच रस्ता वाहून गेल्याने 15 जूनपासून या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील बेळगाव-गोवा वाहतुकीबरोबरच स्थानिक वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.
पावसाने उसंत घेतल्याने भराव घालण्याचे काम पूर्ण
या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर आणि खानापूरमार्गे वळवण्यात आली होती. दीड-दोन महिन्यांत स्थानिक नागरिकांचे अतोनात हाल झाले. त्यानंतर या मार्गावरून 1 जुलैपासून केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला होता. मात्र पावसानेदेखील उसंत घेतल्याने व कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला दगड-मातीचा भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने शुक्रवारपासून या मार्गावरील सर्व वाहतूक राजरोसपणे सुरू झाली आहे.









