पुणे / प्रतिनिधी :
वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक मावळ तालुक्यात दाखल झाल्यामुळे खंडाळा, लोणावळा, कार्ले, भाजे, लोहगड, विसापूरसह सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होत आहेत. दरम्यान, लोहगड परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने अनेक जण किल्ल्यावर अडकून पडले.
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मावळ तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील अनेक पर्यटक रेल्वे गाडय़ांनी मावळ तालुक्यात येत आहे. रविवारी मळवली रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर अनेक पर्यटक पायीच भाजे लेणी व लोहगड किल्ल्याकडे गेले होते. लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याने किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांना पायऱ्यांनी खाली उतरणे मुश्कील झाले. गडावर येणाऱ्या पर्यटकांचा लोंढा एवढा प्रचंड होता, की गडावर असणाऱ्या पर्यटकांना चार ते साडेचार तास एकाच जागेवर खोळंबून राहावे लागले. यामुळे पर्यटकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. सुदैवाने या गोंधळात चेंगराचेंगरी झाली नाही. अन्यथा, भीषण परिस्थिती निर्माण झाली असती. पोलीस प्रशासन व पुरातत्त्व विभागाने या गोष्टीचा विचार करत पुढील शनिवार व रविवारी व सुट्टय़ांच्या दिवशी पर्यटकांची संख्या ध्यानात घेत किल्ल्यावर येणारे पर्यटक यांचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.








