सिक्कीमच्या नदी-तलावात जवानांकडून विविध कसरती
वृत्तसंस्था/ सिक्कीम
भारतीय वायुसेनेने लष्कर आणि नौदलासह चीनच्या सीमेवर असलेल्या सिक्कीमच्या उच्च उंचीच्या भागात हेलोकास्टिंग आणि डायव्हिंग सराव केला. युद्धासारखी परिस्थिती उद्भवल्यास सिक्कीमसारख्या दुर्गम भागात शोध आणि बचावकार्यात या लढाऊ प्रशिक्षणामुळे जवानांना मदत होणार आहे. त्याच अनुषंगाने तिन्ही सेनादलांच्या वेगवेगळ्या पथकांनी युद्धाभ्यास केला. या विशेष सरावाचे फोटो आणि व्हिडिओ भारतीय हवाई दलाने शनिवारी सोशल मीडियावर शेअर केले. तिन्ही दलांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात डायव्हिंगचा सराव केल्याचे सदर निवेदनात स्पष्ट करण्यात आले असले तरी हा युद्धाभ्यास नेमका कधी झाला याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.
सुरक्षा दलांच्या युद्धाभ्यासामध्ये विविध कसरती केल्या जातात. सैन्य जलतरणपटू आणि पाणबुडे हेलोकास्टिंग प्रशिक्षणात वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत असतात. हेलिकॉप्टर आणि बोटींच्या माध्यमातून सैनिकांना पर्वत, मैदानी भाग आणि पाण्याचे स्त्राsत किंवा समुद्र अशा विविध भागात सोडले जाते. अशा वातावरणात युद्धाचे दृश्य तयार करून शोध आणि बचावाचा सराव केला जातो. हॅलोकास्टिंगद्वारे सागरी उपकरणे आणि शस्त्रेही पाण्यात टाकली जातात. हेलोकास्टिंग हे विमान चालक आणि ग्राउंड कामगारांना कठोर परिस्थितीत ऑपरेशनल आव्हानांसाठी तयार करण्यासाठी डिझाईन केले आहे. या सर्व उपकरणांचा आधार घेत हा युद्धाभ्यास केल्याची माहिती सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.









