अबकारी खात्याकडून वाहनांची तपासणी ; वाळपई शहरात वाहतूक कोंडी
वाळपई : सत्तरीतील सर्व धबधबे हाउढसफुल्ल झाल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळाले. पावसाळी हंगामात धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध भागातील लोकांनी रविवारी गर्दी केली होती. याचा परिणाम वाळपई बाजारपेठेवर झाला असून शहरात वाहनांची दिवसभर गर्दी होती. सत्तरीतील सर्वच धबधब्यांवर सकाळपासून पर्यटकांची गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जात असल्याचे पहावयास मिळाले. पाली, चरवणे, हिवरे, सालेली, कोदाळ व इतर धबधब्यांवर पर्यटकांनी भेटी दिल्या. सत्तरीत डोंगराळ भागांमध्ये गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे. यामुळे सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. ओंसडूंन वाहणारे धबधब्यांवर आंघोळ करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाली चरवणे, हिवरे या भागामध्ये वाहनांची मोठी गर्दी असल्याचे दिसून आली. धबधब्यावर जाण्यासाठी सकाळपासून पर्यटक वाहने तसेच प्रवासी बसेस आल्या होत्या. त्यामुळे वाळपई शहरात अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली. खास करून नगरपालिकेच्या समोरील भागात वाहतूक ठप्प होत होती. कारण अनेक पर्यटक मद्य व हॉटेल्समधील पदार्थ खरेदी करण्यासाठी वाहने थांबवत असल्यामुळे चक्काजाम होण्याचा प्रकार घडला.
अबकारी खात्याकडून अनेक ठिकाणी तपासणी
अबकारी खात्याच्या वाळपई विभागाकडून आज अनेक ठिकाणी कडक तपासणी करण्यात आली. धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर कर्मचारी तैनात केले होते. धबधब्यांवर जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत मद्यसाठा जप्त करण्यात आल्या. अनेकांवर दंडात्मक कारवाई केल्याचे निरीक्षक हनुमंतराव देसाई यांनी सांगितले.
चोख पोलीस बंदोबस्त
वाळपईचे पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले की, सर्व धबधब्यांच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे होणारा पर्यटकांचा धांगडधिंगाणा रोखण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे गडेकर यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचा चांगला धंदा
धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटक आले होते. शहरातील व्यापाऱ्यांकडून पाण्याच्या बाटल्या, मद्य व खाद्य पदार्थ खरेदी करण्यास गर्दी केली होती. यामुळे येथील व्यापाऱ्यांचा चांगला धंदा झाला. खरेदीसाठी शहरात लोकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे पहायाला मिळाले.









