निविदा अर्जास 30 पर्यंत मुदत : वाढत्या अपघाताची घेतली दखल
पणजी : वाढते अपघात आणि बळी याची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने रस्ता सुरक्षा तपासणी (रोड सेफ्टी ऑडिट) करण्याचे ठरविले असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने ऑनलाईन पद्धतीने सल्लागार कंपनी नेमण्यासाठी निविदा मागवली आहे. राज्यातील सुमारे 6000 कि.मी. रस्त्यांची तपासणी केली जाणार आहे. येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख असून 30 नोव्हेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. मग सल्लागार कंपनीची नियुक्ती होणार असून गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा तसेच गावातील ग्रामीण भागातील मार्गाची तपासणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी म्हणून ही रस्ता सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याची माहिती बांधकाम खाते सुत्रांनी दिली. या तपासणीत अपघात का होतात? त्यांची ठिकाणे? पादचारी सुविधा किती? याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार असून उपाययोजना तसेच शिफारशी सुचवल्या जाणार आहेत. 90 दिवसात प्राथमिक अहवाल देणे बंधनकारक आहे. त्यानंतर 180 दिवसात प्रकल्प अहवाल मसुदा आणि 210 दिवसात अंतिम अहवाल देण्याची अट घालण्यात आली आहे. नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीस टप्प्याटप्प्याने रक्कम अदा केली जाणार असल्याचे निविदेतून स्पष्ट करण्यात आले आहे.