रविवार सुट्टी असल्याने सर्वांच्या घरांना उमेदवारांनी दिल्या भेटी. जास्तीत जास्त लोकांशी केला संपर्क.
डिचोली : साखळी नगरपालिका निवडणुकीत येत्या शुक्र. दि. 5 मे रोजी होणार असल्याने कालचा रविवारी हा सर्व उमेदवारांसाठी प्रचार रविवार होता. निवडणूकीपूर्वीचा हा एक सुट्टीचा दिवस असल्याने सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पूर्ण केले. सध्या कडक उन पडत असल्याने दुपारची वेळ वगळता सकाळी व संध्याकाळी सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत होते. साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या भाजप व टुगेदर फॉर साखळी या गटांमधील उमेदवार हे रविवारी जोरदारपणे प्रचारात गुंतल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे काही प्रभागांमध्ये अपक्षपणे निवडणूक लढविणारे उमेदवारही प्रचारात व्यस्त होते. भाजपची नेतेमंडळीही रविवारच्या संधीचा लाभ उठवत विविध ठिकाणी लहान सहान बैठका घेत होती. सध्या उकाडा असह्य होत आहे. दुपारी 12 नंतर पडणारे कडक उन यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. त्यामुळे सकाळच्या वेळी उमेदवार आपला काही प्रमाणात प्रचार करतात. व संध्याकाळी 4 वा. नंतर ते रात्रीपर्यंत हा प्रचार सुरूच असतो. साखळी पालिका क्षेत्रातील बहुतेक मतदार कामावर जात असल्याने ते दिवसभर घरात मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी संध्याकाळ किंवा रात्रीची वेळ योग्य असते. परंतु काही खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची कामे पाळी मध्ये असतात. पाळीप्रमाणे जर ते दिवसाच्या पाळीवर कामाला असल्यास मिळू शकत नाही. अशांना रात्री घरात भेटून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. काल रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सर्व लोक आपापल्या घरात असणार या अंदाजाने सर्व उमेदवारांनी ठप्रचार रविवारठ ची संधी साधली. काही प्रभागांमधील उमेदवारांनी आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना सोबत घेऊन रेलीच काढली होती. तर काही उमेदवार अवघेच समर्थक घेऊन फिरत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट मनात ठेऊन सर्व उमेदवार प्रचारात फिरत होते.









