आमदार राजेश फळदेसाई यांचे आश्वासन : जुने गोवेत तिसवाडी मराठी साहित्य संमेलन,कोंकण मराठी परिषद गोवातर्फे आयोजन
जुने गोवे : कोंकण मराठी परिषदेने तिसवाडी मराठी साहित्य संमेलन आपल्या कुंभारजुवे मतदारसंघात आयोजित करून जो आमचा सन्मान केला त्याबद्दल आपण कोंकण मराठी परिषदेचे अध्यक्ष सागर जावडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सदैव ऋणी राहीन. या संमेलनातून आपणास खूप काही शिकायला मिळाले. मराठीच्या कार्यासाठी वैयक्तिक स्तरावर आणि सरकार दरबारीही आपले सर्वतोपरी सहकार्य असेल, असे प्रतिपादन कुंभारजूवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केले. काल रविवारी ब्रम्हपुरी जुने गोवे येथील श्री गोमंतेश्वर देवस्थान सभागृहात गोवा कोंकणी मराठी परिषदेने आयोजित केलेल्या तिसवाडी मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विनायक खेडेकर, कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर, माजी केंद्रीय मंत्री अॅड रमाकांत खलप, देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मीदास मणेरकर, नारायण महाले, सौ चित्रा क्षिरसागर व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या भाषणात पुढे बोलताना फळदेसाईनी सांगितले की अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्यासाठी माझ्याकडून शक्मय असेल ती मदत अवश्य करेन. तसेच सरकारकडून सुध्दा मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. आज गोव्यातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा आपल्या हस्ते सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो, असेही ते म्हणाले. सुरवातीला देवस्थानच्या प्रांगणात साहित्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्यात कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कोमपचे सल्लागार अध्यक्ष अँड रमाकांत खलप यांनी प्रास्ताविक केले. नारायण महाले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
गोमंतकाबाबत विचार व्हायला हवा
संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विनायक खेडेकर यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या इतिहासाचा मागोवा घेतला. गोमंतक हे नाव कसे पडले, याबाबत तर्कबुद्धीने विचार व्हायला हवा. भागवतामध्ये जो गोमंतक प्रांताचा उल्लेख आहे, तो प्रांत हा गोमंतक नाही, हे त्यामधील गोमांचल पर्वताच्या वर्णनावरुन दिसते. त्यात वर्णन केलेला निसर्ग पर्यावरण हे गोव्यातील नाही, हे समजून घ्यायला हवे. ज्ञानेश्वरीत कोकणी शब्द कसे येणार? त्यावेळी गोव्यातील कोकणी लोक आळंदीला गेले होते काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोव्यात पुर्वीच्याकाळी पहाटेला जात्यावर दळण केले जात नव्हते, तर सायंकाळच्या वेळेला दळण केले जायचे, असेही ते म्हणाले. देवस्थानचे अध्यक्ष लक्ष्मीदास मणेरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुदन फडते यांनी सुत्रसंचालन तर कोमप सचिवा सौ चित्रा क्षिरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर तिसवाडी तालुक्याने मराठीसाठी दिलेले योगदान या विषयावर परिसंवाद झाला. त्यात ज. अ. रेडकर, राजू भिकारो नाईक, देविदास आमोणकर, वरद सबनीस संदीप नाईक या वक्त्यांनी भाग घेतला. ज्येष्ठ पत्रकार सुरेश नाईक यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार सोहळा, निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले.









