पूर-पावसाचा प्रभाव कमी न झाल्याने निर्णय
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 17-18 जुलै रोजी राजधानीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने रविवारी सायंकाळी जाहीर केला. सरकारच्या या निर्णयानंतर सर्व शासकीय, शासकीय मान्यताप्राप्त व खासगी शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. पूरस्थितीचा धोका अद्याप कमी न झाल्यामुळे शाळा आणखी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
पुरामुळे दिल्लीची स्थिती कायम असतानाच मुसळधार पाऊस झाला तर दिल्लीतील परिस्थिती आणखी बिघडू शकते. रस्ते, वसाहती आणि पावसाचे पाणी साचल्याने लोकांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. मदत छावण्यांमध्ये राहत असलेल्या लोकांबरोबरच बचावकार्यातही अडचणी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाकडून सावधानता बाळगली जात आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दिल्लीत पूरमय स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस थोडाफार ओसरला असला तरी यमुनेच्या पाण्याची पातळी अजून कमी झालेली नाही. यमुनेच्या पाण्याची पातळी धोक्मयाच्या चिन्हाखाली एक मीटरवर आहे. काही भागात अजूनही पूरसदृश परिस्थिती आहे. यमुनेच्या कहरामुळे दिल्लीतील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुनेच्या किनारी भागात पाणी साचल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.
यमुना नदीच्या पाण्याची पातळी नुकतीच 206.14 वर पोहोचली होती. हथिनी कुंड धरणातून पाणी सोडल्यानंतर यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने जवळपासच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. यमुना नदीचे पाणी दिल्लीकरांसाठी अडचणीचे ठरले आहे. घर, दुकान, गल्ली, रस्ता सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. दिल्लीत जास्त पाऊस बरसला नसला तरी यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी आसपासच्या भागात आले. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली नसती तर दिल्लीत पावसामुळे पूर येण्याची शक्मयता नव्हती.