शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश वाटपाला लागणार वेळ
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील सर्व शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. तरीही शाळेची उर्वरीत कामांसह शाळा स्वच्छतेसाठी शिक्षक मात्र 13 जूनलाच शाळेत हजर राहणार आहेत. शाळेचे वार्षिक व मासिक नियोजन केले जाईल. तर गणवेशाबद्दलचा निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने शाळा व्यवस्थापन समितीला दिल्याने, शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्याच गणवेशात मुलांना शाळेत यावे लागणार आहे. निर्णय होण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने काही दिवस नवीन गणवेशापासून विद्यार्थी वंचितच राहण्याची शक्यता आहे.
शाळा गुऊवारी सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांनीही शाळेत जाण्याची तयारी सुरू केली आहे. शाळेचा गणवेश स्वच्छ करणे, दप्तर, बाटली, छत्री, रेनकोट, पाण्याची बॉटल आदी साहित्याची जुळवा-जुळव सुरू आहे. तब्बल दोन महिन्यानंतर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटून सुट्टीतील गंमती-जमती कधी सांगेण याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. शाळेकडूनच नवीन पुस्तक मिळणार असल्याने फक्त वह्या खरेदी केल्या जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांना बुधवार 13 जून रोजी शाळेत हजर राहावे लागणार असल्याने शेवटच्या रविवारी शिक्षकांना आपली वैयक्तिक कामे पूर्ण करून घेतली. बुधवारी शाळेत हजर झाल्यानंतर शाळा स्वच्छता, शाळेची अपुर्ण राहिलेली कामे केली जाणार आहेत. दोन दिवस शाळा अंतर्गत कामे केल्यानंतर गुऊवारी शाळा सुरू होणार असल्याने पुन्हा शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे.









