महिला-बाल विकास कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन : सुळगा येथे नवीन पुलाचे उद्घाटन
वार्ताहर /उचगाव
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून, संपूर्ण ग्रामीण मतदारसंघाला सर्व सुविधा पुरवणार आहे. तसेच भागासाठी नवीन हॉस्पिटल, नवीन कॉलेज, शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करण्याचे आश्वासन यावेळी दिले. बेळगाव वेंगुर्ला रस्ता चारपदरी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचेही ग्रामीणच्या आमदार व कर्नाटकाच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील सुळगा येथील नवीन पुलाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळगा ग्रामपंचायतच्या अध्यक्ष निर्मला कलखांबकर होत्या. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर, ग्रामपंचायत उपाध्यक्षा अश्विनी खन्नूकर, पीडीओ विना हलवाई आदी उपस्थित होते. सुळगा ग्रामपंचायतीतर्फे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत केले. मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले त्यांच्या आशीर्वादामुळेच मी मंत्री म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. यावेळी युवराज कदम यांनीही आपले विचार व्यक्त केले. आमदार फंडातून पुलासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले होते. केवळ चार महिन्यांमध्ये काम पूर्ण केल्यामुळे कंत्राटदार मनोज कलखांबकर यांचाही सत्कार केला. कार्यक्रमाला सुळगा ग्रामपंचायतीचे सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, भागाण्णा नरोटी, पंचायतीचे सर्व सदस्य, उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य, आंबेवाडी ग्राम. पं. सदस्य, तुरमुरी ग्रामपंचायतचे अध्यक्ष व सदस्य, उचगाव, कल्लेहोळ, आंबेवाडी, सुळगा, राजहंसगड आदी गावातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बेनकनहळी येथील केंबाळी नाल्यावर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व सर्व सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन, आभार एल. डी. चौगुले यांनी केले.









