गुजरातमधील न्यायालयाची टिप्पणी ः गाय केवळ पशू नव्हे माता देखील
वृत्तसंस्था/ तापी
गुजरातच्या तापी जिल्हय़ातील एका न्यायालयने महाराष्ट्रातून पशूंची अवैध वाहतूक केल्याच्या आरोपाप्रकरणी एका व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ज्यादिवशी गायीच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडणार नाही, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व समस्या संपतील असे न्यायालयाने याप्रकरणी निर्णय जाहीर करताना म्हटले आहे.
धर्म गायीतून निर्माण होतो, कारण धर्म वृषभाच्या स्वरुपात असतो आणि गायीच्या पुत्राला वृषभ म्हटले जाते अशी टिप्पणी सत्र न्यायाधीश एस. व्ही. व्यास यांनी केले आहे. मोहम्मद आमीन आरिफ अंजुमला शिक्षा सुनावताना त्यांनी ही टिप्पणी केली आहे. मोहम्मद आमीन आरिफ अंजुमला जुलै 2020 मध्ये एक ट्रकमधून 16 हून अधिक गायी अणि वासरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या पशूंना चारा आणि पाण्याच्या कुठल्याही सुविधेशिवाय दोरखंडाने जखडून ठेवण्यात आले होते.
न्यायायाधीशांनी निर्णय देताना संस्कृत भाषेतील एका श्लोकचे देखील वाचन केले. गाय विलुप्त झाल्यास ब्रह्मांडाचे अस्तित्वही समाप्त होईल असा या श्लोकाचा अर्थ आहे. गायींची कत्तल अस्वीकारार्ह आहे. गोमुत्राचा वापर अनेक आजारांवरील उपचाराकरता केला जात असल्याचे न्यायाधीश व्यास यांनी म्हटले आहे.
गाय केवळ पशू नसून माता आहे. याचमुळे तिला गोमाता म्हटले जाते. गायीसमान कुणीही कृतज्ञ नाही. ज्यादिवशी गायीच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडणार नाही, त्यादिवशी पृथ्वीच्या सर्व समस्या सुटतील आणि पृथ्वीचे कल्याण होणार आहे. जेथे गायी आनंदात जगतात, तेथे धन आणि संपत्ती प्राप्त होते. गाय रुद्रची आई, वसूची कन्या आणि अदितिपुत्रांची बहिण आहे असे उद्गार न्यायाधीशांनी काढले आहेत.









