जतेत जलसंपदा विभागाची आढावा बैठक
जत प्रतिनिधी
जत तालुक्यात सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या म्हैसाळ आवर्तनातून तालुक्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत त्याचबरोबर विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम येळदरीपर्यत पूर्ण झाल्यानंतर ज्या वितरिका तयार करण्यात येणार आहेत त्या करताना गावात जावून अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावा,त्याचे डिझाइन तयार करावे व त्यानुसार अधिकाधिक गावे व तलावही विस्तारितमधून कशा पद्धतीने भरता येतील याचे नियोजन करावे अशा सूचना जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जत येथील शासकीय विश्रामगृहावर आ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली म्हैसाळच्या सर्व विभागाची बैठक पार पडली. बैठकीस म्हैसाळचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, रोहित कोरे आदी सर्व विभाग प्रमुखासह प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आ. सावंत यांनी विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी आप्पाराया बिरादार ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग ,सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे , युवराज निकम ,भूपेंद्र कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आ. सावंत म्हणाले, एका बाजुला आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय हे चित्र बरोबर नाही. जतला पाणी देताना अधिकाऱ्यांनी हयगय करू नये. तालुक्यातील सर्व तलाव, पाझर तलाव, बंधारे भरले पाहिजेत असे नेटके नियोजन होणे गरजेचे आहे. तालुक्यातील वळसंग ,शेड्याळ ,दरीकोनुर आणि अमृतवाडी आणि परिसरातील गावांना आजच्या आज पाणी सोडणेत यावे, कोळगिरीसह अन्य तलावात अद्याप पाणी कसे जाईल याचे नियोजन नाही ते नियोजन करावे तसेच ज्यांच्या जमिनी भूसंपादन केलेल्या आहेत त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत ते पैसे तातडीने वर्ग होणे गरजेचे आहे त्याचा पाठपुरावा करावा, ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे त्याठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते शासनाकडून मिळविण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावेत असा सूचना आ. सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वळसंग येथील भोसले तलावाचे पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना आ. सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विस्तारितची पुढील कामांची डिझाइन तयार करा
विस्तारित योजना जतच्या शेवटच्या टोकापर्यत गेली पाहिजे. विस्तारित योजनेच्या वितरिका तयार करताना प्रत्येक गावात जावून अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावा जेणेकरून अधिकाधिक गावे व त्या भागातील तलावात विस्तारित योजनेचे पाणी जाईल असे सांगून आ. सावंत म्हणाले, विस्तारित योजनेचे काम येळदरीपर्यत पहिल्या टप्प्यात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे पाणी कशा पद्धतीने जाणार याचे डिझाइन अद्याप करायचे आहे तेव्हा अधिकाऱ्यांनी गावात जावून सर्व्हे करून गावे समाविष्ट करावीत व या भागातील सर्व तलावात, बंधाऱ्यात कसे पाणी जाईल हे पहावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या गावात, तलावात पाणी जायला हवे तशी मागणी व अर्ज द्यावा असे आवाहन यावेळी संबधीत अधिकाऱ्यांनी केले.
तर विस्तारितचे काम अडविणार- येळदरी ग्रामस्थ
येळदरी गावातून विस्तारितची योजना जाणार आहे पण त्याचा लाभ येळदरीला नाही. संपूर्ण येळदरीला पाणी द्या तसेच भूसंपादनाचे पैसे द्या नाहीतर विस्तारित योजनेचे पुढे होणारे काम अडविणार असल्याचे येळदरी येथील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले. येळदरी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.