राज्यातील हिंसा अद्याप सुरूच : सुरक्षा दलांकडून कारवाईला वेग
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमधील हिंसक स्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. सरकारकडून या बैठकीकरिता सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ही बैठक आयोजित करण्याचा निर्णय अत्यंत उशिराने घेतला असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मणिपूरच्या लोकांसोबत चर्चेचा प्रयत्न दिल्लीत बसून करण्यात आल्यास यात गांभीर्य दिसून येणार नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशात असताना ही बैठक होत आहे. यातून ही बैठक पंतप्रधानांसाठी महत्त्वपूर्ण नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये अद्याप हिंसा सुरू असून तेथील चूराचांदपूर येथे जाणारे सर्व रस्ते कुकी समुदायाने रोखले आहेत. तर दुसरीकडे सैन्याने कुकी समुदायाच्या सदस्यांकडून तयार करण्यात आलेला एक बंकर नष्ट करण्यात आला आहे. मणिपूरमधून पलायन करणारे लोक आता मेघालयात देखील पोहोचत असल्याने मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी अधिकाऱ्यांना स्थितीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमध्ये स्थिती गंभीर असली तरीही आम्हाला आमच्या लोकांची काळजी घ्यायची आहे, यामुळे मणिपूरमधून मेघालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नेंद ठेवणे आवश्यक असल्याचे कोनराड संगमा यांनी म्हटले आहे.
मणिपूरमध्ये शुक्रवारीही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्व इम्फाळ आणि कांगपोकपी जिल्ह्यांत या घटना घडल्या आहेत. समाजकंटकांच्या विरोधात सैन्याकडून कारवाई केली जात आहे. परंतु महिलांचा एक मोठा समूह सैन्याच्या कारवाईत अडथळे आणत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शुक्रवारी विष्णूपूर जिल्ह्यातील मदत शिबिरांना भेट देत पाहणी केली आहे.









