संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने पुढील आठवड्यात 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान पाच दिवस संसदेचे विशेष अधिवेशन आमंत्रित केले आहे. तसेच या अधिवेशनात संसदेचे कामकाज जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत जाणार आहे. हे पाच दिवसीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवार, 17 सप्टेंबर रोजी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती बुधवारी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. बैठकीचे निमंत्रण सर्व संबंधित नेत्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले आहे, असे जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट केले आहे.
31 ऑगस्ट रोजी संसदीय कामकाजमंत्र्यांनी 18 सप्टेंबरपासून पाच दिवसांसाठी संसदेचे ‘विशेष अधिवेशन’ जाहीर केले होते. मात्र, अधिवेशनाची तारीख जाहीर करताना त्यांनी कोणताही विशिष्ट अजेंडा स्पष्ट केला नाही. या अधिवेशनासाठी अद्याप कोणताही विशिष्ट अजेंडा जाहीर न केल्याने, महिला आरक्षण विधेयक, समान नागरी संहिता, एकाचवेळी निवडणुका किंवा इतर विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशन सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाही त्याचा अजेंडा जाहीर न केल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.









