नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिवाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली असून त्यात सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी सांगितले. संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. संसदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम वर्षअखेरपर्यंत रखडण्याची शक्मयता असल्याने अधिवेशन जुन्या संसदेच्या इमारतीतच होणार आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरला संपणार आहे. या अधिवेशनात 17 बैठका होणार आहेत. लोकसभा आणि राज्यसभेने स्वतंत्र अधिसूचना जारी करून तारखा अधिसूचित केल्या आहेत. 17 व्या लोकसभेचे दहावे अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि सरकारी कामानुसार ते 29 डिसेंबरला संपू शकते, असे लोकसभा सचिवालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणाऱया या अधिवेशनात अनेक नवनवे विषय चर्चेत येऊ शकतात.









