राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दहशतवाद आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला आहे. या भीषण आणि क्रूर हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी केंद्र सरकार जी कृती करेल, तिला आमचे समर्थन असेल, अशी स्पष्टोक्ती बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. सर्व नेत्यांनी देशाच्या हितार्थ मतभेद विसरुन आपल्या एकजुटीचे दर्शन या बैठकीत घडविल्याचे दिसून आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असेही विचार या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केले. सरकार जी कारवाई करु इच्छित असेल, त्या कारवाईला काँग्रेसचे समर्थन असेल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बैठकीत केल्याची माहिती नंतर देण्यात आली आहे.
सरकारकडून माहिती
पेहलगाम येथील भीषण हल्ल्याची सविस्तर माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांना दिली. दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांनी त्यांचा धर्म विचारुन आणि अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या केली आहे. ही घटना साऱ्या देशासाठी क्लेषदायी आणि संतापजनक आहे. देशाच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर हा घाला आहे. भारतात आणि विशेषत: काश्मीरमध्ये शांतता नांदू नये आणि काश्मीरची प्रगती होऊ नये अशा विकृत भावनेतून हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांविरोधात आता कठोर कारवाईची करण्याची वेळ आली असून केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत. सर्व पक्षांचा या कारवाईला पाठिंबा असेल, असे आश्वासक विचार अनेक नेत्यांनी व्यक्त केले.
दोन तास चालली बैठक
संसदभवनात चाललेही सर्वपक्षीय बैठक साधारणत: दोन तास चालली होती. केंद्रीय मंत्री किरण रिजीजूही या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानवर कठोर प्रहार करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले. बैठकीत सर्व पक्षांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. याचा सरकारला विशेष आनंद आहे. या आव्हानात्मक काळात देशाची एकजूट जगाला दिसावयास हवी आहे. सर्वपक्षीय बैठकीतून याचे दर्शन घडले असून सरकार आवश्यक ती कारवाई करण्यास सज्ज आहे, असा संदेशही या बैठकीत सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.
सीमेवर भारत सज्ज
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर भारताने आपल्या सज्जतेचे प्रात्यक्षिक दाखविले आहे. भारतीय वायुदलाच्या राफेल आणि अन्य युद्धविमानांनी ‘आक्रमण‘ या संज्ञेत युद्धाभ्यासास प्रारंभ केला आहे. नौदलास सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारताने आपल्या सैनिकांच्या अनेक तुकड्या सीमावर्ती भागांमध्ये नियुक्त केल्या असून कोणत्याही क्षणी कोणत्याही कार्यवाहीला सैनिक सज्ज असतील, अशी व्यवस्था केली आहे. काश्मीर सीमेवर अत्यंत मोक्याच्या स्थानी सैनिकांना डोळ्यात तेल घालून सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाकिस्तानला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे भारतातील सर्वसामान्य नागरीकांचे मत असून केंद्र सरकारला पेहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानवर मोठी कारवाई करावी लागणार आहे, हे स्पष्ट दिसत आहे. विशेषत: भारतीय वायुदलाने आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केल्याने पाकिस्तानी सेनेवर बंकरमध्ये लपण्याची वेळ आल्याचे चित्र सीमाभागात आहे.
गौतम गंभीरला धमकी
भारताचा माजी आघाडीचा फलंदाज आणि भारतीय संघाचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला ‘आयएसआयएस काश्मीर’ नामक दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर याने त्वरित या धमकीची माहिती दिल्ली पोलिसांना दिली असून तक्रार सादर केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्वरित एफआयआर नोंद करुन घेतला असून ते पुढील कारवाई करत आहेत. आपल्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच आपल्या तक्रारीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्याने पोलिसांकडे केली आहे.
सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन
- केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकजुटीचे दर्शन
- केंद्र सरकार जी कारवाई करेल, तिला विरोधकांकडून समर्थन मिळणार
- भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय संरक्षण दलांचा जोरदार युद्धाभ्यास









