निपाणी : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचा शांततेने मोर्चा सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ निपाणीत सकल मराठा समाजातर्फे शुक्रवारी मूक मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या समाजाच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडण्यात आल्या. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
प्रारंभी सकाळी 11 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधव एकत्र जमले. याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा चाटे मार्केट, नगरपालिकेमार्गे जुना पीबी रोडवरून तहसीलदार कार्यालयात नेण्यात आला. येथे मराठा समाजाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.ग्रेड टू तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी माजी आमदार काका पाटील वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, जयवंत भाटले, प्रवीण भाटले, विजय शेटके, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, शहर भाजप अध्यक्ष प्रणव मानवी, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुमित्रा उगळे, निकू पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी इतर समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.









