महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निश्चितीच्या दृष्टीने सर्वपक्षीयांची लगबग सुरू झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीची पहिली उमेदवारयादीदेखील जाहीर झाली असून, त्यातील नावे पाहिली, की राजकारण नेमके कुठल्या दिशेने चालले आहे, याचे दर्शन घडते. राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीचा गगनभेदी आवाज सध्या चांगलाच गुंजताना दिसतो. असे असले, तरी आजच्या या आवाजी राजकारणात पवार कुटुंबातील घराणेशाही लपण्याचा प्रश्न येत नाही. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत. पवारांपासून त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी फारकत घेतली असेलही. पण, दादा बारामतीचे आमदार, त्यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार आहेत. शिवाय पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार असून, त्यांना पुन्हा एकदा याच मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर बारामतीत दादांविरोधात पवारांनी दुसऱ्या नातवाला म्हणजेच युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले आहे. पवारांविरोधात पवार हा सक्षम पर्याय वाटत असेलही. मात्र, दुसरे नेतृत्व कधी तयार होणार, हा प्रश्न यातून ठळक बनतो. कोकणातली राणेशाहीदेखील अशीच. ठाकरेंच्या घराणेशाहीविरोधात कंठघोष करणाऱ्या राणेंनीही संपूर्ण घरादारालाच सभागृहात पाठविण्याचा जणू चंग बांधला आहे. राणे अलीकडेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे पुन्हा एकदा कणकवलीतून आमदारकी लढवत आहेत. तर ज्येष्ठ सुपुत्र नीलेश राणे हे कुडाळमधून शिंदे गटाच्या माध्यमातून रिंगणात उतरत आहेत. एकाच घरात दोन, तीन पदे जात असतील, तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उतरायच्या का, असा प्रश्न निर्माण होतो. तसा भाजप हा शिस्तबद्ध पक्ष. काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात हा पक्ष नेहमीच रान उठवत असतो. परंतु, त्यांच्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 20 पेक्षा अधिक उमेदवार हे विशिष्ट घराण्याचे नेतृत्व करणारे दिसतात. हे पाहता इतरांच्या घराणेशाहीवर बोलण्याचा या पक्षाला नैतिक अधिकार उरतो का, हे त्यांचे त्यांनीच ठरविले पाहिजे. पक्षाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना नांदेडमधील भोकरमधून उमेदवारी दिली आहे. चव्हाण यांना अलीकडेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवडण्यात आले होते. आता त्यांच्या कन्या विजया यांच्या राजकीय प्रवेशाचा मार्गही भाजपाने मोकळा करून दिला आहे. श्रीजया यांचे आजोबा शंकरराव चव्हाण आणि वडील अशोक चव्हाण या दोघांनीही मुख्यमंत्रिपद भूषविले. अशा मातब्बर घराण्यातील तिसऱ्या पिढीला पुढे आणण्याचा निर्णय उदात्तच म्हटला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठता बसता ठाकरेंच्या घराणेशाहीवर बोलत असतात. पण, कुणाची बायको, तर कुणाचा मुलगा, या पलीकडे त्यांच्या पक्षाच्या उमेदवार यादीत फार काही वेगळे दिसत नाही. आपल्या मुलाचे महत्त्व त्यांनी संघटनेत किती वाढवून ठेवले आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या पक्षाने रत्नागिरीतून उदय सामंत यांना उतरवणे अपेक्षितच. पण राजापुरातून त्यांचे बंधू किरण सामंत यांनीही अर्ज दाखल केला आहे. दोन भाऊ, शेजारचे दोन मतदारसंघ वाटून घेऊ, असा हा सगळा मामला. ठाकरे घराण्यालाही घराणेशाही चुकलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी मागच्याच निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना रिंगणात उतरवून सेनेच्या आगामी नेतृत्वाची तजवीज करून ठेवल्याचे दिसते. अधूनमधून तेजस यांचे नावही चर्चेत असते. त्यांची एन्ट्री कधी होणार, हे पहावे लागेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांना दादर माहीममधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्या अर्थी त्यांनीही हाच मार्ग पत्करला, असे म्हणावे लागले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे आपापले पक्ष सांभाळत आहेत. परंतु, ते भविष्यात एकत्र येतील, अशा चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून रंगत असतात. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा अशा शक्याशक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यात आदित्य व अमितला आमनेसामने आणायचे टाळणे आणि आपला उमेदवार देऊन अप्रत्यक्षपणे मदत करणे, हा तर ठाकरे बंधूंचा उद्देश नाही ना, असा संशय घ्यायलाही जागा उरते. अजितदादांनाही नात्यागोत्याची फार आवड. मकरंदआबांचे बंधू नितीन पाटील यांना दादांनी राज्यसभेवर खासदार केले. तर आपल्या गटात प्रवेश केलेल्या झिशान सिद्दिकीनाही उमेदवारी दिली. काँग्रेस हा पक्षच मुळात घराणेशाहीवर चालणारा. काँग्रेसने आजवर घराणेशाही पोसली, वाढवली. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा बाळगण्याचे कारण नाही. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून भाजपसह सर्व राजकीय पक्ष घराणेशाहीची ही पताका उंचच उंच फडकवताना दिसतात. खरे तर घराणेशाही हा एका पक्षापुरता किंवा राज्यापुरता सीमित विषय राहिलेला नाही. देशातील कुठलेच राज्य वा पक्ष याला अपवाद नाही. इतकी घराणेशाही भारतीय राजकारणात घट्टपणे ऊजलेली आहे. क्रिकेटरच्या मुलाला क्रिकेटर व्हावेसे वाटते. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हावेसे वाटते. मग राजकारण्याच्या मुलाने राजकारणी झाले, तर बिघडले काय, असा प्रश्न आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात नेहमीच उपस्थित केला जातो. वरकरणी तो योग्यच म्हटला पाहिजे. किंबहुना, डॉक्टर वा क्रिकेटरच्या मुलाला जे स्ट्रगल करावे लागते, परीक्षा द्याव्या लागतात, त्या राजकारण्यांच्या कुलदीपकांना द्याव्या लागतात का, इतरांची गुणवत्ता डावलून ते पुढे येतात का, याचा विचार झाला पाहिजे. भारतीय राजकारणात लोकांची मानसिकताही घराणेशाहीला पूरक असते, अशीही मांडणी केली जाते. तिही चुकीची ठरू नये. पवारांचा वारसदार पवारच असावा किंवा ठाकरेंचा वारसदार ठाकरेच हवा, हे जणू आपल्या लोकांनी ठरवूनच टाकले आहे, असे म्हणायला नक्की वाव आहे. हे बघता सर्वपक्षीय घराणेशाही अटळच म्हटली पाहिजे.








