तीन मंडळे विदेशातून परतली, जयशंकरना भेटली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान आणि त्याचा दहशतवाद यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडण्यासाठी भारताने अनेक देशांमध्ये पाठविलेल्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमधील तीन शिष्टमंडळे भारतात परतली असून, त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आहे. आपल्याला कोणते अनुभ आले आणि कोणत्या देशाने भारताच्या या ’ग्लोबर आऊटरीच’ अभियानाला कसा प्रतिसाद दिला, यासंबंधी माहिती या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी त्यांना दिली आहे.
दहशतवादाविरोधात भारताचा संघर्ष आणि त्यातील प्रगती हा या शिष्टमंडळांच्या विदेशातील चर्चांचा मुख्य विषय होता. मात्र, या बरोबरच इतर अनेक संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्या देशांना या प्रतिनिधीमंडळांनी भेटी दिल्या, त्या देशांच्या प्रमुख नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ‘सिंदूर’ अभियान, भारत-पाकिस्तान संबंध आणि त्यातील तणाव, दहशतवादी हल्ल्याला भारताचे प्रत्युत्तर आणि इतर विषयांवरील त्यांची मते शिष्टमंडळांसमोर व्यक्त केली, असे समजते.
गुंतवणूकविषयक चर्चा
दक्षिण कोरिया या देशाच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या शिष्टमंडळांशी बोलताना दक्षिण कोरियाच्या भारतातील गुंतवणुकीविषयी चर्चा केली. दक्षिण कोरियाच्या भारतात किमान 700 ते 800 कंपन्या आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या भारतातील शाखांमध्ये मोठी गुंतवणूक पेलेली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या गुंतवणुकीच्या सुरक्षितेसंबंधी त्यांनी चर्चा केली, अशी सूत्रांची माहिती आहे.
पर्यटनाविषयी बोलणी
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील पर्यटनाच्या सुरक्षितेवरही जपान, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी काही प्रश्न उपस्थित केले असे अनधिकृत वृत्त आहे. या देशांनी भारताच्या दहशतवादविरोधी संघर्षाला पाठिंबा दिला आहे. भारतीय शिष्टमंडळांनी या देशांच्या शंकांना आणि चिंतांना समर्पक उत्तरे देताना, भारतातील या देशांची गुंतवणूक अत्यंत सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. भारत पाकिस्तानला फारसे महत्व देत नाही. तथापि, पाकिस्तानच्या पाठिंब्याने पहलगाम येथे जो हल्ला करण्यात आला, त्यामुळे भारताला प्रत्युत्तर द्यावेच लागले. हा चार दिवसांचा मर्यादित संघर्ष होता. तो करण्यात भारताचा एक विशिष्ट आणि तात्कालीक हेतू होता. तो साध्य झाला. त्यानंतर पाकिस्ताने विनंती केल्यावरुन भारताने शस्त्रसंधी प्रस्ताव स्वीकारला, अशी माहिती शिष्टमंडळांनी दिली.
प्रदेशातील स्थिती पूर्वपदावर
जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येत असून तेथील वातावरण पर्यटनासाठी पोषक बनत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मनात भीती होती ही बाब खरी असली तरी आता पुन्हा या प्रदेशात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटनावर या दहशतवादी हल्ल्याचा किंवा त्यानंतरच्या सिंदूर अभियानाचा विपरीत परिणाम होणार नाही. भारत हा गुंतवणूक आणि पर्यटन यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित देश आहे, असे शिष्टमंडळांनी स्पष्ट केले.
युक्रेन-रशिया संबंधीही प्रश्न
युक्रेन-रशिया युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष यांच्या संदर्भात भारताची भूमिका काय आहे, असा प्रश्नही काही देशांच्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना विचारला. भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. प्रश्न युद्धाने नव्हे, तर चर्चेतून सुटतात, ही भारताची ठाम भूमिका असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भूमिकेचा नेहमी उच्चार केला आहे. हा काळ युद्धाचा नसून चर्चेचा आहे, असे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे. भारताला पाकिस्तानशीही संघर्ष नको आहे. मात्र, पाकिस्तानने कुरापत काढल्यास त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे भारताचे कर्तव्य आहे, हे शिष्टमंडळांनी स्पष्ट केले.









